मुकुंद संगोराम mukund.sangoram@expressindia.com

पडघम वाजू लागलेत. नगारे दुमदुमायला लागलेत. कुजबुज सुरू झालीये.. वृत्तपत्रांमधील पानंच्या पानं शहरातल्या नव्या कामांच्या टेंडरच्या जाहिरातींनी भरून वाहू लागलीयेत. पुढील वर्षी  पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुका ‘लागतील’, म्हणजे त्यांची घोषणा होईल. मग नवी आश्वासने देणे बंद, मतदारांना गंडवता येईल, अशा नव्या कल्पनांचं आमिष दाखवता येणार नाही. निवडून आलेल्या आणि परत तिकीट मिळवू इच्छिणाऱ्या नगरसेवकांचं गेलं वर्ष वाया गेलं करोनामुळे. तरीही त्यांनी रस्ते सॅनिटायझरने धुवून काढले. घरोघरी मुखपट्टय़ा वाटल्या. सोसायटय़ांना हात न लावता सॅनिटायझर मिळण्यासाठी लोखंडी स्टँड दिले. अख्खं शहर पूर्णपणे बंद असताना, याच नगरसेवकांनी आपापल्या जवळच्या कार्यकर्त्यांना कामाला आणि पोटालाही लावलं. दिसेल तिथं भाजीपाल्याचे स्टॉल्स लावले. गर्दी होऊ नये, दुकानं वेळेत बंद होतायत ना, हे पाहण्यासाठी म्हणून दंडुकेधारी कार्यकर्ते नेमले. स्वत: मात्र शक्यतो घरीच राहणं पसंत केलं अनेकांनी. पैसे सोडले म्हणून कार्यकर्ते खूश.

निवडणुका जवळ आल्या, की सगळ्यांना प्रभागात करायची कामं आठवतात. गेली चार वर्षे जे कधी लक्षातच आलं नव्हतं, ते आता डोळ्यांना खुपायला लागलंय. गेल्या वर्षभरातलं कामाचं नियोजन फसल्यामुळे लगेचच जास्तीत जास्त काम काढली पाहिजेत, यावर सर्व पक्षांच्या नगरसेवकांचं एकमत झालंय. जी टेंडरं निघतायत, ती बहुतेक दिखाऊ कामांची आहेत. रस्त्याला पुन्हा एकदा डांबराचा थर चढवून ते गुळगुळीत करायचे, सोसायटय़ांना बाकं पुरवायची, रस्त्यांचे पदपथ आणखी रूंद करून तिथे पथारीवाल्यांची सोय करायची, डांबरी रस्ते सिमेंटचे करायचे.. एक ना दोन. अशी अनेक कामं आता सुरू होतील. वेळ फार थोडा उरलाय हाताशी. कधीही निवडणुका जाहीर होतील, मग आचारसंहिता लागू होईल. त्यानंतर काहीच नव्यानं करता येणार नाही. लगबग झालीये नुस्ती.

काळजी करू नका, यंदाच्या अर्थसंकल्पात करवाढ होण्याची शक्यताच नाही. आहे तो कर भरला नाही, अशांकडून नाना आमिषं दाखवून तो वसूल करण्याची आयडिया आहे त्यांच्याकडे. पाणी तर कधीच कमी होणार नाही तुमचं. नळ चालू ठेवा घरातले. जिने धुवून काढा, मोटारींना फवारून घ्या, झाडांना अजीर्ण होईपर्यंत पाणी पाजा. तुमचा कचरा वेळेवर नेण्याची स्वतंत्र व्यवस्था केलीये त्यांनी तुमच्यासाठी. ते ‘स्वच्छ’ का काय, त्यांना हाकलून लावलंय. नवी व्यवस्था आता कारभाऱ्यांच्याच हातातली आहे. करोना काळात बेकार झालेल्या आणि राहिलेल्यांसाठी केलेली ही व्यवस्था आहे. निवडणूक होईपर्यंत तुम्हीच राजे आणि ते नगर‘सेवक’. हवं ते मागा. मिळेल. गेली अनेक वर्षे तुम्ही त्या कारभाऱ्यांच्या घराचे उंबरे झिजवत होतात ना.. आता ते तुमच्या दाराशी लीन होऊन उभे राहतील. त्यांचे फोटो काढून ठेवा. न जाणो पुन्हा अशी संधी येईल की नाही.

निवडणुकीपर्यंत सगळं शहर चकाचक होणार, हे पक्कं लक्षात ठेवा. रस्त्यातले दिवे सुरू राहतील, तुमच्या इमारतींनाही रंगरंगोटी करून मिळेल. तुमच्या हरएक इच्छा पूर्ण करायचा चंग बांधलाय त्यांनी. ही सगळी लढाई फक्त तिकीट मिळेपर्यंत चालेल, हे मात्र ध्यानात ठेवा. एकदा का तिकीट मिळालं, की मग पैशांचा धूर कोणत्या रंगाचा असतो, ते तुम्हाला दिसेल.

मागच्या महापालिका निवडणुकीच्या अगदी तोंडावर नोटबंदी आली.

नव्या नोटा मिळत नव्हत्या. अनेकांना तर दोन हजाराची नोट दिसते कशी हे पण ठाऊक नव्हतं. पण निवडणुकीच्या धामधुमीत तुम्ही सगळे गुलाबी झालातच ना. विसरलात एवढय़ात? खुल्या मनानं निवडणुकीच्या प्रचाराला सामोरे जा. शहर आपलंच आहे, नगरसेवक नसले तरी..