News Flash

दिल्ली फारच जवळ आहे!

वाढत असलेली वाहनसंख्या आणि रस्ते रुंदीकरणाचा अतिमंद वेग यामुळे शहरात राहणाऱ्यांना लवकरच दिल्लीत राहत असल्याचा अनुभव येऊ शकणार आहे

तीस लाख वाहनसंख्या असलेले पुणे अद्याप दिल्ली कसे झाले नाही, असा प्रश्न सध्या पुण्यातील नगरसेवकांना भेडसावयाला लागलेला आहे! एके काळी देशाची सूत्रे ज्या शहरातून चालविली जात त्या पुणे शहराला दिल्लीची खराब हवामानाची शान मिळवण्यात धन्यता वाटावी, असे या सगळ्यांचे वर्तन आहे. दरवर्षी वाढत असलेली वाहनसंख्या आणि रस्ते रुंदीकरणाचा अतिमंद वेग यामुळे शहरात राहणाऱ्यांना लवकरच दिल्लीत राहत असल्याचा अनुभव येऊ शकणार आहे. ‘स्वच्छ पुणे, सुंदर पुणे’ अशी महापौरांची सूचना बासनात बांधून ‘हरित पुणे’ अशी नवी घोषणा शहरभर फिरवली गेली, तरीही या शहराचे ‘हिरवे कवच’ दिवसेंदिवस कमीकमी होत आहे, याची जाणीव शहर नियोजन करणाऱ्यांना नाही. त्यात नगरसेवकांची नाना प्रकारची लुडबुड होत राहिल्यामुळे शहरातील कोणताही भूखंड लवकरात लवकर बिल्डरांकडे किंवा झोपडपट्टी दादांकडे जाण्याचे मार्ग अधिक सुकर होत राहतात. या शहरात स्वच्छ हवा विकत घेण्याची वेळ येण्यापूर्वीच पावले उचलून कठोर निर्णय घेण्याची वेळ खरेतर निघून चालली आहे. तरीही हे सगळे जण आपापल्या वॉर्डात रमले आहेत आणि तेथील इंचाइंचावर लक्ष ठेवून बसले आहेत.
स्मार्ट शहर ही केवळ पालिकेच्या प्रशासनाची गरज असल्याच्या थाटात वावरणाऱ्या या नगरसेवकांनी स्वत:हून कधीही महिला स्वच्छतागृहांचा प्रश्न धसास लावला नाही. पालिकेच्या सभागृहात असलेल्या  नगरसेविकांनीही त्याकडे कधी लक्ष दिले नाही. न्यायालयाचे आदेश येण्याची वाट पाहण्याची खरेतर गरजच नव्हती, परंतु तरीही यातल्या कुणालाही त्याबद्दल कधी क्लेश होताना दिसत नाहीत. शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था धुळीला कशी मिळेल, याकडे सगळे जण टक लावून बसलेले असतात. त्यामुळे पीएमपी या संस्थेकडे सापत्नभावाने पाहण्याची वृत्ती बळावते. पीएमपीला जणू आपल्या खिशातले पैसे द्यावे लागतात, अशा थाटात, भीक दिल्यासारखे वागवणे हे त्याचेच द्योतक. आपापल्या वॉर्डात अधिकाधिक बसेस धावाव्यात, यासाठी कधी कोणी जीव टाकून काम करताना दिसत नाही. याचे कारण पीएमपी ही फक्त भ्रष्टाचार करण्यासाठीच आहे, अशी सर्वाची समजूत आहे. अशाने या शहरातील प्रत्येकाकडे एकहून अधिक वाहने असतील, तर दोष कोणाला द्यायचा?
पर्यावरण हा जगण्याच्या मुळावर येणारा भयावह प्रश्न आहे, याचे भान या नगरसेवकांना कधी येण्याची शक्यता नाही. त्यामुळे येत्या काही काळात या शहराला काळ्या रंगाच्या ढगांचे आच्छादन लाभणार आहे. शहरातून वाहणाऱ्या मुठा नदीचा नाला या कुणाला दिसत नाही. तेथे सुटणारी दरुगधी यातील कुणाच्याही नाकाला झोंबत नाही. मैलापाण्याची व्यवस्था करणे त्यांना महत्त्वाचे वाटत नाही. असे घडत राहिले, तर स्मार्ट ऐवजी गलिच्छ शहर अशी या शहराची नवी ओळख होईल. पण कुणालाच कशाचे काही देणेघेणे नसल्याने या शहराला खरेच कुणी वाली नाही, याचे दु:ख पुणेकरांना सहन करावे लागत आहे. वाढते विकार ही रुग्णालयांसाठी उपयोगी गोष्ट असली, तरीही शहरासाठी वाईट आहे, हे समजणे त्यासाठी आवश्यक आहे. कचऱ्यासारखा प्रश्न आपण गेल्या कित्येक वर्षांत सोडवू शकलेलो नाही, याबद्दल तिळमात्र त्रास एकाही नगरसेवकाला होत नाही. दुसऱ्या गावात जाऊन आपला कचरा टाकण्याची घाणेरडी पद्धत दूर करण्यासाठी सर्वानी एकत्र येऊन निर्णय घेणे आणि ते पाळण्यासाठी आग्रह धरणे आवश्यक असते. पण कुणाचे काहीच अडत नाही.
किती काळ अशा समस्याग्रस्त शहरात राहायचे, याचा विचार नागरिकांच्या आधी नगरसेवकांनी करायला हवा. त्यांनी आणि त्यांच्या नेत्यांनी विचार म्हणजे काय, हेही आधी समजून घ्यायला हवे. कागदी घोडे नाचवत मेट्रोचे जे बारा वाजले आहेत, ते पाहता या शहरात आता आणखी काही चांगले घडण्याची शक्यता नाही, अशी नागरिकांची भावना होऊ लागली आहे. नव्या वर्षांच्या सुरुवातीलाच आपण नेमके काय करत आहोत आणि काय करायला पाहिजे, याचा ताळेबंद जर नगरसेवकांनी मांडला नाही, तर या शहराचे काही खरे नाही!
mukund.sangoram@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 6, 2016 3:35 am

Web Title: lokjagran mukund sangoram pmc
Next Stories
1 हिंजवडीचा प्रवास नको रे बाबा !
2 कर्मचाऱ्यांच्या नव्या करारासंदर्भात ‘रुपी बँके’च्या संघटनांना नोटीस
3 कर्मचारी कपात झाल्याखेरीज ‘रुपी’चे विलीनीकरण अशक्य
Just Now!
X