News Flash

लोकमान्य टिळक सन्मान पारितोषिक डॉ. अरुणन यांना प्रदान

‘लोकमान्य टिळक सन्मान पारितोषिक’ डॉ. अरुणन यांना ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते शनिवारी प्रदान करण्यात आले,

| August 2, 2015 03:15 am

अंतराळातील कोणतीही मोहीम असो, त्यात विविध धोके असतात, पण धोका पत्करल्याशिवाय यश मिळत नाही, हे विविध मोहिमांतून स्पष्ट झाले आहे, असा विश्वास भारताच्या मंगळयान मोहिमेचे प्रकल्प संचालक व ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सुब्बय्या अरुणन यांनी व्यक्त केला. २०१७ मध्ये सुरू होणाऱ्या चांद्रयान-२ या मोहिमेसाठी पूर्वीपेक्षाही अत्याधुनिक यंत्रणा तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे, अशीही माहिती त्यांनी दिली.
लोकमान्य टिळक यांच्या ९५ व्या स्मृतिदिनानिमित्त टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारे ‘लोकमान्य टिळक सन्मान पारितोषिक’ डॉ. अरुणन यांना ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते शनिवारी प्रदान करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, उपमहापौर आबा बागुल, डॉ. अरुणन यांच्या पत्नी गीता, ट्रस्टचे विश्वस्त रोहित टिळक, प्रणती टिळक, गीताली मोने- टिळक आदी त्या वेळी उपस्थित होते. धनंजय किर लिखित ‘बायोग्राफी ऑफ लोकमान्य टिळक’ व प्रणती टिळक यांनी अनुवादित केलेल्या ‘पिपल्स हीरो, लोकमान्य टिळक’, ‘स्टोरी ऑफ लोकमान्य टिळक’ या पुस्तकांचे प्रकाशनही या वेळी करण्यात आले.
सन्मानाबाबत बोलताना डॉ. अरुणन म्हणाले,की लोकमान्यांच्या नावाने पुरस्कार मिळणे माझ्यासाठी प्रतिष्ठेचे आहे. मंगळयानाच्या मोहिमेमध्ये माझ्याबरोबर काम करणाऱ्या सर्वाचाच हा सन्मान आहे. त्यामुळे हा सन्मान मी माझ्या सहकाऱ्यांना अर्पण करतो. पत्रकारांशी संवाद साधताना डॉ. अरुणन यांनी पुढील योजनांची माहिती दिली. ते म्हणाले,‘चांद्रयान २ ही मोहीम २०१७ मध्ये सुरू होणार आहे. या मोहिमेत आता प्रत्यक्ष चंद्रावर यान उतरवून अभ्यास करण्यात येणार आहे. त्यासाठी अत्याधुनिक यंत्र तयार करण्यात येत आहे. सूर्याचा अभ्यास करण्यासाठीही ‘आदित्य’ ही मोहीम २०२० मध्ये सुरू होणार आहे. या माध्यमातून आपण सातत्याने सूर्याची निरीक्षणे तपासू शकणार आहोत.’
सुशीलकुमार शिंदे म्हणाले,‘उद्याचा भारत बलवान होईल, हे स्वप्न टिळकांनी पाहिले होते. डॉ. अरुणन यांचे संशोधन राष्ट्राला खूप उंचीवर घेऊन जाणारे आहे. त्यांनी देशाला मोठे यश मिळवून दिले. त्यातून जगात भारताची मान उंचावली. हेच स्वप्न टिळकांनी पाहिले होते.’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2015 3:15 am

Web Title: lokmanya tilak award to dr arunan
Next Stories
1 अकरावी व्यावसायिक शिक्षणाचा नवा अभ्यासक्रम यावर्षीपासूनच
2 शहीद जवानाच्या पत्नीला शासनाने हिरावून घेतलेली जमीन परत मिळाली
3 स्मार्ट सिटीच्या सूचनांसाठी ऑनलाइन मतदान
Just Now!
X