भारतीय स्वातंत्र्यलढय़ाचे सेनानी लोकमान्य टिळक यांची अनेक दुर्मिळ छायाचित्रे केसरीवाडा येथील टिळक संग्रहालयात पाहाण्यास मिळतात. लोकमान्यांची दुर्मिळ छायाचित्रे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावीत आणि त्यातून लोकमान्यांचे जीवनचरित्रही  समाजात पोहोचावे या उद्देशाने ‘लोकमान्य’ हे चित्रमय चरित्र तयार करण्यात आले आहे. मंडाले कारागृहातून सुटल्यानंतर लोकमान्य ज्या दिवशी पुण्यात पोहोचले (१५ जून १९१४)

अकोला बोट क्लबला लोकमान्यांची भेट

त्या दिवसाचे औचित्य साधून येत्या रविवारी (१५ जून) या पुस्तकाचे प्रकाशन केले जाणार आहे.
लोकमान्यांची मंडालेतून सुटकेचे हे शताब्दी वर्ष आहे. त्या निमित्ताने लोकमान्य टिळक स्मृती अभियानातर्फे विविध उपक्रम सुरू आहेत. या उपक्रमांतर्गत लोकमान्यांची छायाचित्रे पाठवण्याचे आवाहन गेल्या वर्षी नागरिकांना करण्यात आले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत काही छायाचित्र नागरिकांकडून आली. अशी छायाचित्रे आणि टिळक संग्रहालयातील अनेक अप्रकाशित छायाचित्रे यांचा समावेश ‘लोकमान्य’मध्ये करण्यात आल्याचे स्मृती अभियानाचे अध्यक्ष शैलेश टिळक यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. आर्ट पेपरवर छपाई करण्यात आलेल्या या पुस्तकात लोकमान्यांचा जीवनपट उलगडवून दाखवणारी तीनशे छायाचित्र पाहायला मिळतील. या चित्रमय चरित्राचे मूल्य तीनशे रुपये असून रविवारी होत असलेल्या समारंभात त्याचे प्रकाशन करण्यात येणार आहे.
 रत्नागिरीच्या शाळेतील रजिस्टरमध्ये मोडी लिपीत केलेली लोकमान्यांच्या नावाची नोंद, पुणे म्युनिसिपालटीच्या मतदार यादीतील टिळकांचे नाव, सुरत काँग्रेस, बनारस काँग्रेसची छायाचित्रे, लोकमान्यांचा लंडन दौरा, चिरौल खटला, राष्ट्रीय शाळेची स्थापना, केसरी-मराठा वृत्तपत्राचा प्रारंभ, लेबर पार्टीला लोकमान्यांनी दिलेली दोन हजार पौंडांची देणगी, स्वदेशी वस्तूंच्या दुकानाची सुरुवात आदी शेकडो घटनांची छायाचित्रे वा दस्तावेजांची छायाचित्रे या चित्रमय चरित्रात पाहायला मिळतील असेही टिळक यांनी सांगितले.
– लोकमान्यांचे बालपण, स्वातंत्र्यसमर, नेते व सहकारी, लोकमान्यांची दूरदृष्टी, त्यांना देण्यात आलेली मानपत्र, निधन, स्मृती आणि चित्रकारांच्या कुंचल्यातून लोकमान्य असे ‘लोकमान्य’ या चित्रमय चरित्राचे आठ विभाग आहेत.
– त्यातील अनेक छायाचित्रे तत्कालीन इतिहासावर प्रकाश टाकणारी.