लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी स्वातंत्र्यलढय़ात दिलेल्या योगदानाला उजाळा देण्यासाठी त्यांचा पुतळा दिल्लीतील महाराष्ट्र सदनात बसवण्याचे ‘लोकमान्य टिळक विचार मंच’ या संस्थेने ठरवले आहे. विशेष म्हणजे संस्था या पुतळ्यासाठी लोकवर्गणी काढणार असून सामान्य नागरिकांनी किमान दहा रुपयांपासून वर्गणी देऊन पुतळ्याच्या निधीला हातभार लावावा, असे आवाहन संस्थेने केले आहे.
संस्थेचे अध्यक्ष शैलेश टिळक यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते माधव भंडारी, ज्येष्ठ पत्रकार अरविंद व्यं. गोखले, नगरसेविका मुक्ता टिळक, भाजपचे शहर सरचिटणीस संदीप खर्डेकर या वेळी उपस्थित होते.
सध्या महाराष्ट्र सदनात लोकमान्यांचा पुतळा अथवा प्रतिमा नाही. मंडालेच्या तुरुंगातून लोकमान्यांची सुटका झाल्याच्या घटनेला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या वर्षी हा पुतळा बसवण्याचे काम पूर्ण व्हावे, अशी संस्थेची भूमिका आहे. या उपक्रमासाठी संस्थेला गणेश मंडळांचे सहकार्य मिळाले असून गणेशोत्सव काळात काही गणेश मंडळांकडे हा निधी जमा करता येणार आहे. अधिक माहितीसाठी संस्थेचा संपर्क क्रमांक- ०२०- २४४५०९८९.
महाराष्ट्रातील प्रश्नांवरच विधानसभा जिंकू
– माधव भंडारी
चार राज्यांमधील विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये भाजपची पीछेहट झाल्याबद्दल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना भंडारी म्हणाले, ‘‘प्रत्येक निवडणूक वेगळी असते. बिहार, उत्तर प्रदेश किंवा कर्नाटकमध्ये काय झाले याचा महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीवर परिणाम दिसणार नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीविषयी जनतेत प्रचंड असंतोष आहे. महाराष्ट्राच्या प्रश्नांवरच महायुती निवडणूक जिंकेल.’’