एकीकडे पुण्याचे तापमान हे चाळीस अंश सेल्सिअसच्या जवळपास पोहचले असतानाच लोकसभेचे राजकारण तापण्यास सुरूवात झाली आहे. मावळ लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि घटक पक्ष्याचे अधिकृत उमेदवार पार्थ अजित पवार यांच्या प्रचारार्थ पिंपरी-चिंचवड शहरातून आज रविवारी दुचाकी रॅली काढण्यात आली. विशेष म्हणजे वडील अजित पवार आणि सुपुत्र उमेदवार पार्थ पवार हे एकाच जिप्सीमधून रॅलीत सहभागी झाले होते. पवार कुटुंबिय हे पार्थ यांचा प्रचार करण्यासाठी जिवाचे रान करताना दिसत आहेत.

निगडीच्या भक्ती शक्ती शिल्पाचा आशीर्वाद घेऊन अजित पवार आणि पार्थ पवार यांनी रॅलीला सुरुवात केली. यावेळी शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. अजित पवार आणि पार्थ हे दोघे एकाच जिप्सी मधून रॅलीत सहभागी झाले. रस्त्याने प्रत्येक व्यक्तीला अजित पवार हे नमस्कार करत होते. दरम्यान, अजित पवार यांनी सुपुत्र पार्थसाठी सर्वदूर प्रचार करण्यासाठी कंबर कसली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून पवार कुटुंबातील आई सुनेत्रा पवार, वडील अजित पवार, भाऊ जय पवार आणि चुलत भाऊ रोहित पवार आणि अजित पवार यांची बहीण हे सर्व पिंपरी-चिंचवड मध्ये बैठका घेत असून पार्थचा प्रचार करत आहेत. हे सर्व पाहता पवार कुटुंबाची प्रतिष्ठा पणाला लागलेली दिसत आहे. अजित पवार हे स्वतः विरोधक असू की सामान्य नागरिक, कार्यकर्ता याच्याशी फोनद्वारे संपर्क साधत आहेत. दुसरीकडे शिवसेनाचे विद्यमान खासदार आणि उमेदवार श्रीरंग बारणे हे पार्थ पवार यांच्या विरोधात बोलणे टाळत आहेत.