‘लोकसत्ता-अर्थब्रह्म’ वार्षिकांकाच्या निमित्ताने विशेष कार्यक्रम

पुणे : देशाचा आणि राज्याचा अर्थसंकल्प मांडल्यानंतर त्याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या मासिक अर्थसंकल्पावर होतो. या पाश्र्वभूमीवर महिन्याचे नियमित खर्च झाल्यावर उर्वरित पैशांतून गुंतवणुकीचे नियोजन का आणि कसे करावे याचे मर्म पुणेकरांना बुधवारी (६ मार्च) सोप्या शब्दांमध्ये उलगडणार आहे.

‘आदित्य बिर्ला सनलाईफ म्युच्युअल फंड’ प्रस्तुत ‘लोकसत्ता अर्थब्रह्म’ वार्षिकांकाच्या निमित्ताने पुणेकरांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. एलआयसी, बँक ऑफ महाराष्ट्र, एलआयसी हाऊसिंग फायनान्स आणि मिरॅडोर रिअ‍ॅल्टी हे उपक्रमाचे पॉवर्ड बाय सहयोगी आहेत. कार्यक्रमास प्रवेश सर्वासाठी खुला आणि विनामूल्य आहे.

या कार्यक्रमात ‘भांडवली बाजारातील गुंतवणूक’ या विषयावर भरत फाटक मार्गदर्शन करणार आहेत. समभागांच्या व्यवहारासाठी गुंतवणुकीचे धोरण कसे असावे याबाबत ते मार्गदर्शन करतील. तर, ‘प्राप्तिकरातील नव्या तरतुदी’ या विषयावर अमेय कुंटे बोलणार आहेत. गुंतवणुकीच्या विविध पर्यायांसाठी वित्तीय नियोजन कसे करावे आणि ते आवश्यक कसे ठरते याबाबतचे विवेचन या प्रसंगी हे दोन्ही वक्ते करणार आहेत. उत्पन्न आणि खर्च यांचा मेळ साधतानाच, कर आणि महागाईवर मात करणारा परतावा मिळविण्यासाठीचे अर्थनियोजन या कार्यक्रमात स्पष्ट होईल.

तज्ज्ञांना प्रश्न विचारून गुंतवणूकविषयक शंकांचे निरसन करून घेण्याची संधी उपस्थितांना उपलब्ध आहे. यापूर्वीच्या अशा मार्गदर्शक पर्वाचा लाभ पुणेकरांनी घेतला आहे.

कार्यक्रमासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश असेल. भांडवली बाजारातील अस्थिरतेत समभाग खरेदी-विक्रीबाबतचे धोरण काय असावे? नव्या वित्त वर्षांसाठी आर्थिक नियोजन कसे आणि का करावे? अशा गोंधळात टाकू शकणाऱ्या प्रश्नांची उत्तरे पुणेकरांना कार्यक्रमात मिळणार आहेत.

‘लोकसत्ता अर्थब्रह्म’ या वार्षिकांकाच्या निमित्ताने हा कार्यक्रम होत असून अर्थपूर्ण गुंतवणुकीसाठी मार्गदर्शक ठरणारा हा सहावा वार्षिकांक आहे. तो या निमित्ताने गुंतवणूकदारांना कार्यक्रमस्थळी उपलब्ध होणार आहे.

पुणेकरांसाठी उद्या गुंतवणूक मार्गदर्शन

कधी : बुधवार, ६ मार्च २०१९, सायंकाळी ६ वाजता

कुठे : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे बाल शिक्षण मंदिर सभागृह,

मयूर कॉलनी, कोथरूड

तज्ज्ञ मार्गदर्शक, विषय

भरत फाटक : भांडवली बाजारातील गुंतवणूक

अमेय कुंटे : प्राप्तिकरातील नव्या तरतुदी

कार्यक्रम सर्वासाठी खुला आणि विनामूल्य प्रवेश