‘लोकसत्ता अर्थसल्ला’मध्ये तज्ज्ञांचा कानमंत्र

पिंपरी : महागाई ही बचतीची शत्रू आहे, ती आपल्या पैशांना खाते. त्यामुळे आजच्या काळात बचत नव्हे, तर गुंतवणूक आवश्यक आहे. मात्र, ती आहाराप्रमाणे समतोल असावी. त्यासाठी आर्थिक साक्षर होण्याची गरज आहे, अशा शब्दांत ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ या कार्यक्रमात गुरुवारी गुंतवणूक क्षेत्रातील तज्ज्ञांकडून पिंपरी-चिंचवड पालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना कानमंत्र मिळाला. गुंतवणुकीचे विविध पर्याय आणि फायद्यांविषयीही या कार्यक्रमात सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

‘आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड’ प्रस्तुत हा कार्यक्रम पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्यालयातील सभागृहात (पहिला मजला, जीबी हॉल) झाला. पिंपरी-चिंचवडच्या महापौर माई ढोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाला सुरुवात झाली. ‘समजदार गुंतवणुकीचे मर्म’ या विषयावर गौरव जजू यांनी मार्गदर्शन केले. ‘गुंतवणुकीतून आर्थिक नियोजन’ या विषयावर प्रशांत चौबळ सविस्तर माहिती दिली. महापालिकेच्या सर्वच विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

गौरव जजू म्हणाले, की महागाईची स्थिती पाहता आजच्या काळात बचत नव्हे, तर गुंतवणुकीची आवश्यकता आहे. त्यासोबत आरोग्य विमाही गरजेचा आहे. मालमत्ता ही गुंतवणूक असली, तरी त्यातच संपूर्ण गुंतवणूक नसावी. सोन्यातील गुंतवणूक कधी-कधी धोक्याची ठरू शकते. अशा वेळी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. म्युच्युअल फंड आपल्या गुंतवणुकीच्या सर्व गरजा पूर्ण करू शकतो. पण, कधी आणि कशावर गुंतवणूक करावी, याचा सल्ला अवश्य घ्यावा. कमी वयात म्हणजेच शक्य तितक्या लवकर केलेली अधिकाधिक रकमेची म्युच्युअल फंडातील गुंतवणूक नेहमीच फायद्याची ठरते. त्यामुळे ती सर्वोत्तम गुंतवणूक ठरते.

प्रशांत चौबळ म्हणाले, की गुंतवणुकीचे नियोजन समतोल आहाराप्रमाणे करणे गरजेचे असते. महागाई, आरोग्यावरील खर्च, शिक्षणाचा खर्च वाढतो आहे. दुसरीकडे व्याजाचे दर घसरत आहेत. अशा स्थितीत आर्थिक साक्षर होत आपल्या गरजा लक्षात घेऊन योग्य गुंतवणुकीचा मार्ग निवडला पाहिजे. शेअर बाजार हा जुगार असतो, हे मान्य नाही. त्याचा योग्य अभ्यास महत्त्वाचा आहे. म्युच्युअल फंडातील गुंतवणूकही या काळात आवश्यक आहे. गुंतवणुकीच्या पारंपरिक पद्धतीशिवाय इतर पर्याय निवडायला हवेत. त्यासाठी सध्या आधार कार्डप्रमाणेच डिमॅट खाते आवश्यक झाले आहे. ती आधुनिक काळाची गरज आहे. त्यासाठी आताच करसल्लाकाराची भेट घ्या. गुंतवणूक ही एक कला असून, ती आत्मसात करा. सुनील वालावलकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.