शहरात दोन महिन्यांपासून पादचारी महिला तसेच रिक्षा प्रवाशांकडील पिशवी हिसकावणाऱ्या चोरटय़ांनी उच्छाद मांडला आहे. पिशवी हिसकावणाऱ्या चोरटय़ांना पकडण्यासाठी पोलिसांना गस्त घालण्याच्या सूचना दिल्या आहेत. कर्वेनगर भागात सहवास हॉलनजीक दुचाकीस्वार तरुणीकडील पिशवी दुचाकीस्वार चोरटय़ांनी हिसकावून नेल्याची घटना शनिवारी घडली.

याबाबत कोथरूड भागातील एका तरुणीने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तक्रारदार तरुणी रात्री दहाच्या सुमारास कर्वेनगर भागातून निघाली होती. त्या वेळी दुचाकीस्वार चोरटय़ांनी खांद्याला लटकवलेली दुचाकीस्वार तरुणीकडील पिशवी हिसकावली. पिशवीत एक

हजार रुपये, मोबाइल संच असा ऐवज होता. सहायक पोलीस निरीक्षक एल. एस. उकिर्डे तपास करत आहेत. गेल्या दोन महिन्यांत पिशवी हिसकावण्याचे दहा ते बारा गुन्हे शहरात घडले आहेत.

पोलिसांना अपयश

बाहेरगावाहून पहाटे एसटी स्थानक तसेच रेल्वे स्थानकात येणारे प्रवासी रिक्षातून निघाल्यानंतर दुचाकीस्वार चोरटे रिक्षाचा पाठलाग करून प्रवाशाकडील पिशवी हिसकावतात.  कर्वे रस्ता, कोथरूड, नळस्टॉप चौक, जंगली महाराज रस्ता, स्वारगेट भागात पिशवी हिसकावण्याचे गुन्हे घडले आहेत. या चोरटय़ांना पकडण्यात पोलिसांना अपयश आले आहे.