एटीएममधील सीसीटीव्ही चित्रीकरणाची पडताळणी

गणेशखिंड  रस्त्यावरील कॉसमॉस बँकेच्या मुख्यालयात असलेल्या सव्‍‌र्हरवर हॅकरने हल्ला चढवून रुपे डेबिट कार्ड आणि व्हिसा कार्डधारकांची गोपनीय माहिती चोरून ९४ कोटी ४२ लाख रुपयांची रक्कम लांबविल्या प्रकरणात देशभरातील ४१ शहरांमधील ७१ बँकांच्या एटीएम केंद्रातून रोकड  काढल्याची माहिती तपासात मिळाली आहे. अडीच हजार व्यवहारांद्वारे विविध एटीएम केंद्रांतून अडीच कोटी रुपये काढण्यात आले आहेत. याबाबतची तांत्रिक माहिती घेण्याचे काम विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) सुरू आहे.

तांत्रिक माहिती क्लिष्ट असल्याने या माहितीचे विश्लेषण क रण्यास वेळ लागणार आहे. महाराष्ट्रातील  ज्या बँकांच्या एटीएम केंद्रातून पैसे काढण्यात आले आहेत. त्या एटीएम केंद्रात असलेल्या सीसीटीव्ही चित्रीकरण तपासकामी ताब्यात घेण्यात येणार असल्याची माहिती सायबर गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त ज्योतिप्रिया सिंह यांनी दिली.

महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, कोल्हापूर, मुंब्रा तसेच मध्य प्रदेशातील इंदूर शहरातील एटीएम केंद्रातून पैसे काढण्यात आले आहेत. ज्या बँकांच्या एटीएम केंद्रातून पैसे काढण्यात आले आहेत. तेथील सीसीटीव्ही चित्रीकरण पडताळण्यात येणार आहे.

बँकेच्या खातेदाराने पैसे काढले का अन्य दुसऱ्या व्यक्तीने हे पैसे काढले, याची माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे पोलीस उपायुक्त सिंह यांनी सांगितले.

काही एटीएम केंद्रातील कक्षात सीसीटीव्ही चित्रीकरण अंधुक आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हे चित्रीकरण सुस्पष्ट करण्यात येणार आहे. कॉसमॉस प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांकडून विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या प्रकरणी कॉसमॉस बँकेकडून तांत्रिक माहिती मागविण्यात आली आहे.