हल्लेखोर अटकेत

गणेशखिंड रस्त्यावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात व्यावसायिकावर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. व्यावसायिकावर गोळीबार करून पसार झालेल्या हल्लेखोराला पाषाण-बावधन रस्त्यावर पोलिसांनी पकडले. दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या व्यावसायिकावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

समीर किसन येनपुरे (वय ३९, रा. मेहेंदळे गॅरेजनजीक, एरंडवणे) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. येनपुरेंच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी शुक्राचार्य मधाळे (रा.मेहेंदळे गॅरेजनजीक, एरंडवणे) याला चतु:श्रुंगी पोलिसांकडून अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येनपुरे यांचा फ्लेक्स तयार करण्याचा व्यवसाय आहे. आरोपी मधाले याची एरंडवणे भागात टपरी आहे. काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून टपरीवर कारवाई करण्यात आली होती. येनपुरे यांच्या तक्रारीवरून अतिक्रमण विभागाने कारवाई करण्यात आली असावी, असा समज झाल्याने मधाले येनपुरे यांच्यावर चिडून होता. दुचाकीस्वार येनपुरे शनिवारी सकाळी एरंडवणे भागातून सांगवीला राहणाऱ्या नातेवाइकांकडे निघाले होते. त्यांच्या मागावर मधाले होता. येनपुरे सकाळी अकराच्या सुमारास गणेशखिंड रस्त्यावर आले. त्या वेळी  मधालेने पुणे विद्यापीठ चौकात येनपुरेंवर पिस्तुलातून गोळीबार केला.

गजबजलेल्या गणेशखिंड रस्त्यावर गोळीबार झाल्याने परिसरात घबराट उडाली. दरम्यान, मधाले गणेशखिंड रस्त्याने औंधच्या दिशेने पसार झाला. दरम्यान, चतु:श्रुंगी पोलीस तसेच गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. येनपुरेंना तातडीने खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले.

पोलिसांनी औंध रस्ता भागात तातडीने नाकाबंदी केली. पसार झालेला दुचाकीस्वार मधाले पाषाण भागातून बावधनच्या दिशेने निघाला होता. गस्त घालणारे पोलीस कर्मचारी अतुल इंगळे आणि शिवाजी आयवळे यांनी मधालेला पाठलाग करून पकडले. चतु:श्रुंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे.