17 February 2019

News Flash

नवोदित अभिनेत्रीचा विनयभंग केल्याप्रकरणी अभिनेता अटकेत

सुभाष दत्तात्रय यादव असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

( संग्रहीत छायाचित्र )

मराठी चित्रपटसृष्टीतील नवोदित अभिनेत्रीबरोबर असभ्य वर्तन केल्याप्रकरणी एका अभिनेत्याला पोलिसांकडून अटक करण्यात आली. अभिनेत्री आणि अभिनेत्याला चौकशीसाठी वानवडी पोलीस ठाण्यात बोलावले असताना अभिनेत्याने पुन्हा तिच्याबरोबर असभ्य वर्तन केल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

सुभाष दत्तात्रय यादव (वय २७) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका तेवीस वर्षीय अभिनेत्रीने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ती मूळची मुंबईतील आहे. गेल्या दोन वर्षांपासून अभिनेता आणि तक्रारदार अभिनेत्री चित्रीकरणाच्या निमित्ताने एकत्र आले होते. आठवडय़ापूर्वी या चित्रपटाचे प्रदर्शन झाले होते. दरम्यान, चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना त्याने तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला होता. काही दिवसांपूर्वी तिने त्याला समज दिली होती. त्यानंतरही तो तिच्या मोबाईलवर संपर्क साधून त्रास देत होता. काही दिवसांपूर्वी तिने सुभाषला चतु:श्रृंगी मंदिराच्या परिसरात बोलावून घेतले आणि समज दिली होती. तेव्हा त्याने तेथे गोंधळ घातला होता. त्यावेळी अभिनेत्रीबरोबर असलेल्या मोटारचालकाने पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली होती.

दरम्यान, त्याने एक ध्वनिचित्रफीत मोबाईलवरून प्रसारित केली होती. अभिनेत्रीने त्याच्या विरोधात वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. पोलिसांनी शनिवारी दोघांना चौकशीसाठी वानवडी पोलीस ठाण्यात बोलावून घेतले होते. पोलिसांकडून सुभाषची चौकशी करण्यात आली.  त्यानंतर त्याने पोलीस ठाण्याच्या आवारात तिच्याबरोबर असभ्य वर्तन केले. अभिनेत्रीने पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.  पोलीस उपनिरीक्षक आर. पी. बागुल तपास करत आहेत. दरम्यान, आरोपी सुभाष यादवला रविवारी न्यायालयाने जामीन मंजूर केला.

 

First Published on September 3, 2018 3:55 am

Web Title: loksatta crime news 127