सासू, दिरासह इतर दोन महिला अटकेत

विवाहात हुंडा न दिल्याने महिलेचा दीर आणि सासूने गळा दाबून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांकडून दिरासह तीन महिलांना अटक करण्यात आली आहे.

कविता चेतन रेड्डी (वय २८, रा. आनंद पार्क सोसायटी, धानोरी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी दीर सोनू अंजनिया रेड्डी (वय २४) याच्यासह त्याची आई, मामेसासू आणि नणंदेला अटक करण्यात आली आहे. कविता यांचे वडील करबसप्पा हणमंतराव मळ्ळी (वय ६०, रा. गुलबर्गा, कर्नाटक) यांनी या संदर्भात विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कविताचा दीड वर्षांपूर्वी चेतन यांच्याशी विवाह झाला होता. चेतन बांधकाम ठेकेदार आहे.आनंद पार्क भागात रेड्डी कुटुंबीयांचा बंगला आहे. विवाहानंतर सासू, दीर, नणंद आणि मामेसासूने कविताचा छळ सुरू केला.

गेल्या काही दिवसांपासून कविताने सासूशी बोलणे बंद केले होते. शुक्रवारी सकाळी कविताच्या वडिलांनी मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. त्या वेळी सासूने कविताला हाक मारली तसेच तिच्याबरोबर वाद घालण्यास सुरुवात केल्याचे वडील करबसप्पा यांच्या निदर्शनास आले. काही वेळानंतर करबसप्पा यांनी पुन्हा तिच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा कविताचा मोबाइल क्रमांक बंद होता. त्यानंतर करबसप्पा यांनी जावई चेतन यांच्याशी संपर्क साधला आणि कविताचा मोबाइल क्रमांक बंद असल्याचे सांगितले. त्यानंतर चेतन घरी गेले. तेव्हा कविता बेशुद्धावस्थेत पडली होती. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच ती मरण पावली होती. कविताच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीत सासू, दीर, मामेसासू आणि नणंदेने तिचा गळा दाबून खून केल्याचा संशय व्यक्त केला आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ए. जी. सायकर तपास करत आहेत.