अनैसर्गिक संबंध ठेवण्यासाठी अल्पवयीन मुलांना चाकूचा धाक दाखवून धमकावणाऱ्या तरूणावर त्याच अल्पवयीन मुलांनी चाकूने वार केल्याची घटना टिळक रस्त्यावर रविवारी दुपारी घडली. पूरम चौकानजीक अर्धवट बांधकाम झालेल्या एका इमारतीत ही घटना घडली. दरम्यान, याप्रकरणी खडक पोलिसांकडून एकाला अटक करण्यात आली असून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेत जखमी झालेल्या तरूणावर ससून रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

दिनेश उर्फ गण्या सुरेश कांबळे (वय २४, सध्या रा. महात्मा फु ले मंडई परिसर) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी मयूर मोतीराम राठोड (वय १८, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) याला खडक पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. याप्रकरणात पोलिसांकडून दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कांबळेविरोधात अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. त्याच्यावर हल्ला करणाऱ्या मुलांविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती खडक पोलिसांकडून देण्यात आली.

कांबळे सध्या मंडई भागात राहायला आहे. लक्ष्मीनगर भागातील अल्पवयीन मुले आणि राठोड यांच्याबरोबर त्याची ओळख आहे. रविवारी दुपारी ते येरवडा भागात भेटले. राठोड आणि अल्पवयीन मुलांना कांबळे टिळक रस्ता भागात घेऊन आला. पूरम चौकातील यामाहा दुचाकी विक्रीच्या दालनासमोर एक अर्धवट बांधकाम झालेली इमारत आहे. या इमारतीतील एका खोलीत मुलांना तो घेऊन गेला. काही वेळानंतर त्याने मुलांना अनैसर्गिक कृत्य करण्यासाठी धमकावण्यास सुरूवात केली. चाकूचा धाक त्याने दाखविला. राठोड आणि त्याच्याबरोबर असलेल्या मुलांबरोबर कांबळेची झटापट झाली. झटापटीत कांबळेकडील चाकू मुलांनी हिसकावला व त्याच्यावरच चाकूने वार केले. झटापट झाल्यानंतर कांबळे आणि मुले इमारतीच्या बाहेर पळाली. त्या वेळी तेथून पोलीस शिपाई अमित पवार दुचाकीवरून जात होते. त्यांनी हा प्रकार पाहिला. प्रसंगावधान राखून पोलीस शिपाई पवार यांनी राठोड तसेच त्याच्याबरोबर असलेल्या दोन अल्पवयीन मुलांना  पकडले. त्यांच्याबरोबर असलेला एक अल्पवयीन मुलगा पसार झाला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी घटनास्थळी भेट दिली.

गजबजलेल्या रस्त्यावरील निर्मनुष्य इमारतीचे गूढ

टिळक रस्त्यावर पूरम चौकानजीक असलेल्या या निर्मनुष्य इमारतीविषयी अनेकांना गूढ आहे. गेल्या काही वर्षांपासून ही इमारत अर्धवट बांधलेल्या अवस्थेत आहे. या इमारतीचा मालक कोण आहे, याची माहिती देखील या भागातील रहिवाशांना नाही. या इमारतीच्या दारात कचरा टाकण्यात येतो. तेथे कोणी जातही नाही.