मुळशी तालुक्यातील लवळे गावात असलेल्या जमिनीबाबत तक्रारदाराच्या बाजूने निकालपत्र देण्यासाठी एक कोटींची लाच मागितल्या प्रकरणी शनिवारी रात्री तहसीलदार सचिन डोंगरे याच्यासह पत्रकार किसन बाणेकर यांना अटक करण्यात आली. न्यायालयाने रविवारी दोघांना २ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

तहसीलदार सचिन डोंगरे (वय ४२,रा. लेझी रॉक सोसायटी, बावधन )आणि पत्रकार किसन बाणेकर (वय ४०,रा. लवळे, ता. मुळशी) यांना रविवारी सायंकाळी शिवाजीनगर न्यायालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने हजर केले. डोंगरे याच्या वतीने बाणेकर यांनी लाच स्वीकारली. डोंगरे यांनी ज्या कामासाठी लाच स्वीकारली होती, त्याबाबतची कागदपत्रे डोंगरे यांच्या कार्यालयात आहेत. कार्यालय बंद असून या कागदपत्रांच्या प्रती तपासून घ्यायच्या आहेत. डोंगरे याच्या बंगल्याची झडती घ्यायची आहे. त्याच्या बँकेतील लॉकरची तपासणी करायची आहे.  पत्रकार बाणेकर तहसील कार्यालयात दलाल म्हणून वावरत आहे. त्याची चौकशी करायची आहे. त्यामुळे दोघांना  पोलीस कोठडी देण्याची विनंती सरकार पक्षाकडून करण्यात आली. बचाव पक्षाकडून अ‍ॅड. हेमंत झंझाड, अ‍ॅड.नंदकुमार शिंदे, अ‍ॅड. विवेक भरगुडे, अ‍ॅड. कुमार पायगुडे  यांनी बाजू मांडली. न्यायालयाने डोंगरे आणि बाणेकर यांना २ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

नेमके प्रकरण काय ?

या प्रकरणातील तक्रारदार ज्येष्ठ नागरिक आहेत. सध्या ते दौंड येथे वास्तव्यास आहेत. तक्रारदाराच्या पूर्वजांना  मुळशी तालुक्यात अनेक ठिकाणी इनामावर जमिनी मिळाल्या आहेत. तक्रारदार वारसदार आहे. त्यांची मुळशी तालुक्यातील लवळे येथे शेत जमीन आहे. नातेसंबंधातील एकाने वडिलोपार्जित जमिनीची फसवणूक करुन परस्पर विक्री केली होती. तक्रारदाराने वारसा नोंदीसाठी मुळशीतील तहसील कार्यालयात संपर्क साधला होता. याबाबतचे प्रकरण मंत्रालयात गेले होते. तेथील सचिवांनी या कागदपत्रांची पुन्हा छाननी करुन अहवाल देण्यासाठी हे प्रकरण तहसील सचिन डोंगरे यांच्याकडे पाठविले होते. तक्रारदाराने वेळोवेळी संपर्क साधून निकालपत्र देण्याची विनंती केली होती. निकालपत्र देण्यासाठी डोंगरे यांनी १ कोटी रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे नुकतीच तक्रार केली. शनिवारी सायंकाळी लवासा रस्त्यावर डोंगरे याच्या वतीने पत्रकार बाणेकर यांनी लाच स्वीकारली.

तहसीलदाराची मोठी मालमत्ता

लाचखोर तहसीलदार सचिन डोंगरे याचा सोलापूर जिल्ह्य़ातील मोहोळ तालुक्यात असलेल्या पापडी गावात बंगला आहे. तसेच मोहोळ येथील एका बँकेत लॉकर आहे. करमाळा येथील बँकेत एक लॉकर असून त्याच्या चाव्या डोंगरे याच्याकडे आहेत. सोलापूर येथे एक बंगला आहे. त्याची झडती घेण्याचे काम सध्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरु आहे.