खराडीतील उच्चभ्रू सोसायटीतील घटना

अनोळखी व्यक्तीशी समाजमाध्यमावर (फेसबुक) झालेली ओळख एका ज्येष्ठ महिलेला महागात पडली. संबंधित व्यक्तीने भावनिक बाबी सांगून ज्येष्ठ महिलेशी जवळीक वाढविली. त्यानंतर घरात शिरून तिजोरीतील सुमारे आठ लाखांचे दागिने लांबविल्याची घटना खराडी भागातील एका सोसायटीत घडली.

चंदननगर पोलिसांकडून याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्येष्ठ महिलेच्या ४३ वर्षीय मुलाने याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यावसायिक आहेत. खराडी भागातील एका उच्चभ्रू सोसायटीत व्यावसायिक आणि त्यांची आई राहायला आहे. जुलै २०१८ मध्ये तक्रारदाराच्या आईला एकाने समाजमाध्यमातून मैत्रीची विनंती पाठविली होती. त्यानंतर अनोळखी व्यक्ती बरोबर तक्रारदाराच्या आईचा संवाद वाढला. ‘मला आई-वडील नाहीत. मला घरातून बाहेर काढण्यात आले आहे,’अशी बतावणी अनोळखी व्यक्तीने त्यांच्याकडे केली होती.

ओळख वाढल्यानंतर संबंधित व्यकती दोन ते तीन वेळा त्यांच्या घरी आली होती. काही दिवसांपूर्वी तक्रारदार व्यावसायिक काही कामानिमित्त मुंबईला गेले होते. त्या वेळी त्यांची आई घरात एकटी होती. आई स्वयंपाकाच्या गडबडीत होती. दुपारी एकच्या सुमारास अनोळखी व्यक्ती त्यांच्या घरी आली. आईचे लक्ष नसल्याची संधी साधून तिजोरीची चावी चोरली. तिजोरीतील रोकड, सोने-चांदीचे दागिने आणि दोन घडय़ाळे लांबवून अनोळखी व्यक्ती पसार झाली. तिजोरीतील दागिने चोरीला गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर व्यावसायिकाने पोलिसांकडे नुकतीच तक्रार दिली. अनोळख्या व्यक्तीने आईचे लक्ष चुकवून चोरी केल्याचे तक्रारदाराने फिर्यादीत म्हटले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मुळीक तपास करत आहेत.