लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी एकाच दिवशी तीन ठिकाणी कारवाई करून लाच घेणाऱ्या तीन पोलिसांना पकडले. वानवडी पोलीस ठाण्यातील हवालदार, शिवाजीनगर पोलीस मुख्यालयातील वरिष्ठ लिपिक आणि शिक्रापूर पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस फौजदारावर याबाबत कारवाई करण्यात आली आहे.

शिक्रापूर पोलीस ठाण्यातील प्रकरणामध्ये तक्रारदाराच्या अर्जानुसार चौकशी करून गुन्हा दाखल न करण्यासाठी सहायक पोलीस फौजदार अनिल कोळेकर (वय ५४) यांनी २० हजारांची लाच मागितली होती. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार आल्यानंतर त्याची पडताळणी करून कोरेगाव-भीमा पोलीस चौकीत सापळा लावण्यात आला. तक्रारदाराकडून २० हजारांची लाच घेताना कोळेकर याला पकडण्यात आले.

शिवाजीनगर पोलीस मुख्यालयामध्ये सहायक पोलीस निरीक्षकाकडे वेतन निश्चितीच्या कामासाठी वरिष्ठ लिपिकाने तीन हजारांची लाच मागितली होती. त्यानुसार आलेल्या तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मुख्यालयात सापळा लावून वरिष्ठ लिपिक मनोज हरी काळे (वय ५२) याला लाच घेताना पकडण्यात आले.

तिसऱ्या प्रकरणामध्ये पोलीस हवालदार निरास मेहमूद खान (वय ४४) यानी एका भंगार व्यावसायिकाकडून १५ हजारांची लाच मागितली होती. चोरीचा माल खरेदी करत असल्याचा आरोप करून त्याबाबत कारवाई न करण्यासाठी ही लाचेची मागणी करण्यात आली होती. तडजोडीनंतर पाच हजार रुपये लाच घेण्याचे मान्य करण्यात आले. याबाबत २४ एप्रिलला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली. त्यानुसार गुरुवारी हडपसर येथे सापळा लावण्यात आला. हवालदार खान याच्या सांगण्यावरून पैसे स्वीकारणाऱ्या मेहंदी शेख (वय ३२, रा. हडपसर) याला या वेळी पकडण्यात आले. त्यानंतर खान यांच्यावरही कारवाई करण्यात आली.