दोन पिस्तुले, काडतुसे जप्त

मुळशी तालुक्यातील लवळे गावात एकाचा खून करून पसार झालेल्या दोघांना संघटित गुन्हेगारीविरोधी पथकाने पकडले. त्यांच्याकडून देशी बनावटीचे दोन पिस्तुल, चार काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

दत्ता ऊर्फ बबलू बाळू मालपोटे (वय २५, रा. कातारखडक भैरवनाथवाडी, ता. मुळशी) व नीलेश श्रीपती शिंदे (वय २८, रा. विठ्ठलवाडी, पौड, ता. मुळशी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तीन आठवडय़ांपूर्वी मालपोटे आणि शिंदे यांनी राजेश कुंभार याचा लवळे गावात खून केला होता. या प्रकरणी पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. संघटित गुन्हेगारीविरोधी (गुंडा स्कॉड, उत्तर विभाग) चे पथक दिघी भागात गस्त घालत होते. त्या वेळी दिघी मॅग्झिन चौकात मालपोटे येणार असल्याची माहिती पोलीस नाईक राजनारायण देशमुख यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने तेथे सापळा लावला. पोलिसांना पाहताच मालपोटे पळाला. त्याला पाठलाग करून पकडण्यात आले. पोलिस नाईक राजनारायण देशमुख यांना माहिती मिळाली, की दत्ता मालपोटे हा सराईत दिघी येथील मॅग्झिन चौकात आळंदी रस्त्यावर संशयित रीत्या हत्यार घेऊन कोणाचीतरी वाट पाहत उभा आहे. त्यानंतर पोलिस त्या ठिकाणी गेल्यावर पोलिसांना पाहून मालपोटे पळू लागला. त्यानंतर त्याचा पाठलाग करून पोलिसांनी त्याला पकडले. त्याची झडती घेण्यात आली. तेव्हा त्याच्याकडे देशी बनावटीचे  पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे सापडली. चौकशीत त्याने नीलेश शिंदे याच्याकडून पिस्तूल घेतल्याची कबुली दिली. शिंदे देहू फाटा परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. मालपोटे आणि शिंदे नीलेश गावडे टोळीतील आहेत. दोघांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

पोलिस उपायुक्त पंकज डहाणे, सहायक पोलिस आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक ब्रह्मानंद नाईकवाडी, सहायक पोलिस निरीक्षक गणेश पवार, उपनिरीक्षक पोपटराव गायकवाड, नरेंद्र सोनवणे, भालचंद्र बोरकर, दीपक भुजबळ, रमेश भिसे, किरण चोरगे, गणेश बनसुडे, दत्ता फुलसुंदर, नवनाथ चांदणे, तानाजी गाडे, प्रदीप शेलार, नीलेश शिवतारे, राजू मोरे, शीतल शिंदे यांनी ही कारवाई केली.