फर्गसन रस्त्यावरील घटना; मोटारचालक अटकेत

सम-विषम दिनांक न पाहता रस्त्याच्या कडेला चारचाकी वाहन लावल्यामुळे वाहतुकीस अडथळ होतो. बेशिस्तपणे चारचाकी लावल्यामुळे कोंडीत भर पडते. अशा वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून मोटारींच्या चाकांना जॅमर बसविण्यात येते, मात्र एकाने मोटारीच्या चाकाला लावलेले जॅमर काढून टाकण्यासाठी चाक काढले  आणि दुसरे चाक बसवले. पसार होण्याच्या तयारीत असलेल्या मोटारचालकाला डेक्कन पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणी कमलेशकुमार शुक्ला (वय ४१, रा. कोरेगाव पार्क) याला अटक करण्यात आली आहे. डेक्कन वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक सुनील भोसले यांनी यासंदर्भात डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मोटारचालक शुक्ला यांच्याविरुद्ध मोटार वाहन कायदा, चोरी या कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोटारचालक शुक्ला याने बुधवारी फर्गसन रस्त्यावर वैशाली हॉटेलसमोर मोटार लावली. वैशाली हॉटेलसमोर चारचाकी तसेच दुचाकी वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे. दरम्यान, डेक्कन वाहतूक विभागाने दुपारी पाऊणच्या सुमारास शुक्ला याच्या मोटारीच्या चाकाला जॅमर लावले. काही वेळानंतर पोलीस तेथे आले तेव्हा शुक्ला याने जॅमर लावलेले चाक काढले आणि डिक्कीत ठेवले. दुसरे चाक बसवून पसार होण्याच्या तयारीत असताना शुक्ला याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची चौकशी करण्यात आली तेव्हा जॅमर कारवाई टाळण्यासाठी त्याने चाक काढल्याची कबुली दिली. शुक्ला याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक राहुल कोलंबीकर तपास करत आहेत.

गुन्हय़ाची जाणीव नाही

शहरात बेशिस्तपणे वाहने लावणाऱ्या मोटारी तसेच दुचाकीच्या चाकांना जॅमर लावण्यात येते. काही जण कारवाई टाळण्यासाठी चाकांना लावलेले जॅमर तोडून टाकतात. वाहनांच्या चाकाला जॅमर लावल्यास पोलिसांकडून दोनशे रुपये दंड आकारण्यात येतो, मात्र काही वाहनचालक जॅमर तोडतात. जॅमर तोडणे हा गुन्हा आहे, याची जाणीव अनेकांना नसते. मध्यंतरी मार्केट यार्डात जॅमर तोडून पसार झालेल्या जीपचालकाला पोलिसांनी भोर परिसरातून ताब्यात घेतले होते. जॅमर तोडून पसार होणाऱ्या चालकांना अशा प्रकारच्या गुन्हय़ात अटक होऊ शकते, याची जाणीव नसते. काही केले नाही अशा आविर्भावात मोटारचालक पसार होतात. दोनशे रुपयांचा दंड टाळण्यासाठी अशा प्रकारचे कृत्य केले जाते.