खासदार निधीतून शाळेला मदत मिळवून देण्याच्या आमिषाने चार लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी वारजे पोलिसांकडून एकाला अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणी कृष्णा अजितकुमार डे उर्फ कृष्णा रामप्रकाश छाडी (वय १९, सध्या रा. आदित्य गार्डन, वारजे) याला अटक करण्यात आली आहे. आरोपी कृष्णाचे वडील अजितकुमार डे (मूळ रा. कोलकात्ता) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विश्वंभर बाबर (वय ५४,रा. म्हसवड, ता. माण, जि. सातारा) यांनी यासंदर्भात वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबर कृषी विकास प्रतिष्ठान, देवापूर शैक्षणिक संस्थेचे संचालक आहेत. त्यांचा मुलगा इंद्रजित पुण्यातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. आरोपी कृष्णा याच महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. त्याने माझे वडील अजितकुमार यांची राज्यसभेतील खासदारांशी ओळख आहे. खासदार निधीतून माझे वडील तुमच्या शैक्षणिक संस्थेला मदत मिळवून देतील, असे कृष्णाने इंद्रजित बाबरला सांगितले होते.

त्यानंतर आरोपी अजितकुमार डे यांच्याशी इंद्रजितने संपर्क साधला. डे यांनी चार खासदारांच्या निधीतून प्रत्येकी दहा लाख रुपये अशी चाळीस लाखांची मदत मिळवून देण्याचे आमिष त्याला दाखविले होते. त्यापोटी काही रक्कम मला द्यावी लागेल, असे अजितकुमारने त्याला सांगितले होते.

अजितकुमारने दिलेल्या बँक खात्यात बाबर यांनी पैसे भरले. दरम्यान, खासदार निधीतून पैसे न मिळाल्याने बाबर यांनी अजितकुमार यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. बाबर यांना अजितकुमार याने धमकाविण्यास सुरुवात केली. बाबर यांनी वारजे पोलिसांकडे तक्रार दिली. दरम्यान, इंद्रजित बाबर याचा मित्र आकाश देशमुख (वय २२, रा.म्हसवड) याला केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून त्याच्याकडून आरोपी कृष्णा आणि त्याचे वडील अजितकुमार यांनी पाच लाख ९० हजार रुपये उकळल्याचे उघडकीस आले आहे. वारजे पोलिसांनी कृष्णाला अटक केली असून त्याला न्यायालयाने सोमवापर्यंत (२३ एप्रिल) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस उपनिरीक्षक पी. एस. गायकवाड तपास करत आहेत.