अनैतिक संबंधातून पतीने खून केल्याचे निष्पन्न

प्रेयसीबरोबर विवाह करायचा असल्याने एकाने पत्नी आणि आठ महिन्यांच्या मुलाचा साथीदारांच्या मदतीने खून केल्याची घटना हिंजवडी भागात शनिवारी रात्री घडली. धावती मोटार अडवून चोरटय़ांनी पत्नीकडील दागिने लुटले तसेच पत्नी आणि मुलाचा खून करून चोरटे पसार झाल्याची खोटी तक्रार पोलिसांकडे दिली. तपासात पतीने साथीदारांच्या मदतीने पत्नी आणि आठ महिन्यांच्या मुलाचा खून केल्याची धक्कादायक माहिती उघड झाल्यानंतर पती, प्रेयसीसह, दोन मारेकरी अशा चौघांना अटक करण्यात आली.

अश्विनी दत्ता भोंडवे (वय २५, रा. दारुंब्रे,ता. मावळ) आणि आठ महिन्यांचा मुलगा अनुज अशी खून झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी पती दत्ता वसंत भोंडवे (वय ३०), सोनाली बाळासाहेब जावळे (वय २४, रा.वाकड, मूळ रा. तोंडोली, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर), प्रशांत जगन भोर (वय २५, सध्या रा. हिंजवडी, मूळ रा. जानोरी, इगतपुरी, जि. नाशिक), पवन नारायण जाधव (वय २१, सध्या रा. जयरामनगर, हिंजवडी, मूळ  रा. सोलापूर) यांना अटक करण्यात आली आहे.

शनिवारी दत्ता भोंडवे, पत्नी सोनालीबरोबर सासूरवाडीला आले होते. सासूरवाडीत जेवण केल्यानंतर ते मोटारीतून सायंकाळी साडेसातच्या सुमारास घरी निघाले. मुंबई-बंगळुरु बाह्य़वळण मार्गाने पुढे गेल्यानंतर हिंजवडी भागातील जांबे रस्त्यावर दत्ताने मोटार थांबविली. उलटी करण्याच्या बहाण्याने तो मोटारीतून उतरला.

दरम्यान, दत्ताचे साथीदार जाधव, भोर मागावर होते. त्यांनी दत्ताला चाकूचा धाक दाखविण्याचा बहाणा केला. मोटारीत दोघे जण बसले आणि मोटार नेण्याची सूचना केली. काही अंतरावर  दोघांनी गुंगीचे औषध रुमाला सोनालीच्या नाकावर ठेऊन तिचा बेशुद्ध केले. त्यानंतर सोनालीचा गळा दोरीने आवळला आणि मुलगा अनुज याचे चेहरा रुमालाने दाबला. जाधव आणि भोरने दत्ताच्या डोके तसेच पाठीवर किरकोळ स्वरूपाच्या जखमा केल्या. सोनालीच्या गळ्यातील दागिने काढून दोघे जण पसार झाले.

चोरटय़ांनी पत्नी आणि मुलाचा खून करून दागिने लुटल्याची तक्रार त्याने दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, सहायक आयुक्त सतीश पाटील, गुन्हे शाखेचे आयुक्त भानुप्रताप बर्गे, समीर शेख, सहायक आयुक्त जयश्री गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली.  हिंजवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण वायकर, सतीश माने, राजेंद्र कदम, रंगनाथ उंडे यांच्या पथकाने तपास सुरू केला.

उत्तरातील विसंगतीमुळे आरोपी सापडला

घटनास्थळापासून चिंचवडमधील खासगी रुग्णालय अर्धा तासावर आहे. दत्ता यांनी पत्नी आणि मुलाला अडीच तासांनी रुग्णालयात दाखल केले. तांत्रिक तपासात पोलिसांना काही महत्त्वाचे दुवे मिळाले होते. दत्ताने दिलेल्या उत्तरांमध्ये काही विसंगती आढळली. त्यानंतर पोलिसांचा संशय बळावला आणि दत्ताला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने अनैतिक संबंधातून पत्नी आणि आठ महिन्यांचा मुलाचा खून केल्याची कबुली दिली.

पसरणी घाटातील घटनेची पुनरावृत्ती

आठवडय़ापूर्वी औंध येथील आनंद कांबळे या नवविवाहित युवकाचा पसरणी घाटात २ जून रोजी खून झाला होता. सुरुवातीला कांबळेचा खून चोरीचा उद्देशातून झाल्याचा संशय होता. तपासात त्याची पत्नी दीक्षा हिने प्रियकर निखिल मळेकर याच्याशी संगनमत करून पतीचा खून केल्याचे उघडकीस आला होता. त्या वेळी दीक्षाने पसरणी घाटात उलटी होत असल्याची तक्रार करून मोटार थांबविली होती. त्यानंतर मळेकर आणि त्याच्या साथीदारांनी आनंदचा खून केला होता.