रखवालदाराकडून ९७ लाखांचा ऐवज लंपास

निगडी प्राधिकरण भागातील उद्योजकाच्या बंगल्यात रखवालदार असलेल्या एकाने ९७ लाख २० हजारांचा ऐवज लांबविल्याची घटना रविवारी उघडकीस आली. रखवालदार पसार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत आहे.

या प्रकरणी रखवालदार गोविंद कालू परिहार (मूळ रा. कलाली, लमकी, नेपाळ) आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनोद राजकुमार अगरवाल (वय ४८, रा. पंचवटी बंगला, वृंदावन हॉटेलनजीक, भक्ती शक्ती चौक, निगडी)  यांनी या संदर्भात निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद अगरवाल,  त्यांचा भाऊ संदीप आणि अगरवाल कुटुंबीय बंगल्यात राहायला आहेत. अगरवाल कुटुंबीय शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास बाहेरगावी गेले.

मध्यरात्री ते परतले. तेव्हा बंगल्यातील संदीप अगरवाल यांच्या दुसऱ्या मजल्यावरील  खोलीचा दरवाजा उघडा असल्याचे निदर्शनास आले. शयनगृहातील कपाट उचकटून रखवालदार गोविंद आणि त्याचे साथीदार सोन्याचे दागिने, हिरेजडीत दागिने, मोबाईल संच, लॅपटॉप असा ९७ लाख २० हजारांचा ऐवज लांबवून पसार झाले.

अगरवाल यांनी रखवालदार गोविंदचा शोध घेतला. तेव्हा तो बंगल्यातून पसार झाल्याचे उघडकीस आले. गोविंद आणि त्याच्या साथीदारांनी चोरी केल्याचा संशय अगरवाल यांनी फिर्यादीत व्यक्त केला आहे. दरम्यान, पोलिसांकडून पसार झालेल्या गोविंदचा शोध घेण्यात येत आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकरराव अवताडे तपास करत आहेत.