News Flash

पिंपरी शहरात एकाच दिवशी दोन खून

भाजप शहराध्यक्ष अंकुश लांडगे खूनप्रकरणातील आरोपीचा खून

(संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र)

भाजप शहराध्यक्ष अंकुश लांडगे खूनप्रकरणातील आरोपीचा खून

पिंपरी-चिंचवड शहरात एकाच दिवशी दोन खून झाल्याची खळबळजनक घटना घडली. भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष अंकुश लांडगे यांच्या खूनप्रकरणातील सराईत जितू पुजारी याचा सोमवारी मध्यरात्री खून करण्यात आला. त्यापाठोपाठ देहू फाटा भागात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक घनश्याम खेडकर यांचा पुतण्या राजेंद्र याचा खून करण्यात आला.

भोसरीतील धावडे वस्ती भागातून जितेंद्र ऊर्फ जितू पुजारी सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास निघाला होता. त्यावेळी हल्लेखोरांनी त्याला मारहाण केली. त्याच्या डोक्यात दगड घालण्यात आल्याने तो गंभीर जखमी झाला. पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब बुचडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याला तातडीने यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान तो मरण पावला होता. अंकुश लांडगे खूनप्रकरणात जितू पुजारीला अटक करण्यात आली होती. लांडगे खूनप्रकरणाचा मुख्य सूत्रधार गोटय़ा धावडे, पुजारी यांची जामिनावर सुटका झाली होती. त्यानंतर एका युवतीवर बलात्कार केल्याप्रकरणी न्यायालयाने त्याला शिक्षा सुनावली होती. या प्रकरणात शिक्षा भोगल्यानंतर तो भोसरीत आला होता. दरम्यान, लांडगे खूनप्रकरणातील आरोपी गोटय़ा धावडे याचा खून झाला होता. पुजारीला दारू पिण्याचे व्यसन होते. सोमवारी दुपारी त्याचा किरकोळ कारणावरून काहीजणांशी वाद झाला होता. सोमवारी रात्री धावडे वस्ती भागात त्याला मारहाण करून त्याच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आला.

धावडे वस्ती भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी हल्लेखोरांना टिपले आहे. पुजारीचे नातेवाईक पुण्यात राहायला नाहीत. गोटय़ा धावडेच्या  खुनानंतर पुजारीचा सांभाळ कोणी करत नव्हते. दारूचे व्यसन असल्याने तो नशेत शिवीगाळ करायचा. त्याचा खून किरकोळ वादातून झाल्याचा संशय आहे. भोसरी पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

माजी नगरसेवकाच्या पुतण्याचा खून

दरम्यान, देहू फाटा भागात राजेंद्र दिगंबर खेडकर (वय ३२, रा. चऱ्होली) याचा खून करण्यात आल्याचा घटना सोमवारी घडली. राजेंद्र खेडकर याचा काहीजणांशी वाद झाला होता. या कारणावरून त्याच्या डोक्यात वीट घालून खून करण्यात आला. दिघी पोलिसांनी या प्रकरणी संशयावरून काहीजणांना ताब्यात घेतले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2018 1:38 am

Web Title: loksatta crime news 97
Next Stories
1 जलउदासीनता!
2 धरणक्षेत्रात पावसाची दडी
3 ‘पंढरीची वारी’ आता जगाच्या व्यासपीठावर
Just Now!
X