‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हे ब्रीद सार्थ ठरवत बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना अल्प खर्चात शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देणारे.. शहराच्या दक्षिण भागातील पर्वती परिसरातील ६७ एकर जागेवर वसलेले.. देशाचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते कोनशिला अनावरणाचा झालेला कार्यक्रम.. बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना ज्ञानाच्या मुख्य प्रवाहात सहभागी करून घेणाऱ्या श्री शाहू मंदिर महाविद्यालयाने गेल्या सहा दशकांमध्ये मोठी झेप घेतली आहे. बहुजन समाजातील विद्यार्थ्यांच्या पिढय़ा घडवून त्यांच्या आयुष्याला दिशा देणाऱ्या शाहू महाविद्यालयाने २० जून रोजी साठाव्या वर्षांत पदार्पण केले. यानिमित्ताने महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शोभा इंगवले यांच्याशी साधलेला संवाद.

  • महाविद्यालयाच्या स्थापनेमागची भूमिका काय होती?

पुणे हे विद्येचे माहेरघर आणि महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र म्हणून स्वातंत्र्यपूर्व काळापासून नावाजलेले होते. शहरात अनेक शिक्षण संस्थांची निर्मिती झाली. या संस्थांमध्ये प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंतची सुविधा केवळ उच्चवर्णीयांसाठी उपलब्ध होती. काही अपवाद वगळता बहुजन समाज शिक्षणापासून वंचित होता. स्वातंत्र्यपूर्व काळात बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना विविध विद्याशाखांच्या उच्च शिक्षणाची दारे खुली करून देणारे छत्रपती शाहू महाराज यांचे स्मारक पुण्यामध्ये साकारण्याच्या उद्देशातून कर्मवीर भाऊसाहेब हिरे, बाबुराव जेधे आणि बाबुराव जगताप या अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद संस्थेच्या संस्थापकांनी शाहू मंदिर महाविद्यालयाची स्थापना केली. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी शासनातर्फे जागा उपलब्ध करून दिली आणि पर्वती परिसरामध्ये ६७ एकर आणि १० गुंठे अशा विस्तीर्ण अशा निसर्गरम्य परिसरात २० जून १९६० रोजी शाहू मंदिर महाविद्यालय सुरू झाले.

  • महाविद्यालय सुरू झाले तेव्हा विद्यार्थी संख्या किती होती? आता किती विद्यार्थी शिक्षण घेतात?

– महाविद्यालय सुरू झाले तेव्हा अवघे ११२ विद्यार्थी होते. ज्येष्ठ विचारवंत डॉ. मा. प. मंगुडकर हे महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य होते. महाविद्यालयाच्या स्थापनेच्या वर्षी पहिले नियतकालिक निघाले होते. ते अविरत सुरू राहिले. १९८७ मध्ये प्रा. यू. डी. आरोळे यांनी या नियतकालिकाला ‘राजर्षी’ असे समर्पक नाव सुचविले. विद्यार्थ्यांच्या लेखनकलेला व्यासपीठ मिळावे या उद्देशातून सुरू करण्यात आलेली नियतकालिकाची परंपरा अव्याहतपणे सुरू आहे. महाविद्यालयाच्या स्थापनेपासून प्राचार्यपद भूषविणारी मी आठवी व्यक्ती आहे. माझ्या कार्यकाळात महाविद्यालयाचा सुवर्णमहोत्सव झाला होता आणि आता षष्टय़ब्दी वर्षांत पदार्पण होत असताना मी प्राचार्य आहे, याचा आनंद आहे.

  • महाविद्यालयाचे विविध उपक्रम कोणते आहेत?

– विद्यार्थी कल्याण मंडळ, कमवा आणि शिका योजना, बहुज्ञान विकास स्पर्धा, बहि:शाल शिक्षण मंडळ, राष्ट्रीय सेवा योजना, कला आणि सांस्कृतिक मंडळ, विद्यार्थिनी मंच, वाङ्मय मंडळ, निसर्ग मंडळ, विवेकवाहिनी, व्यक्तिमत्त्व विकास केंद्र, मुलींसाठी राष्ट्रीय छात्र सेना अशा वैविध्यपूर्ण उपक्रमांद्वारे महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या विकासामध्ये योगदान दिले आहे. पुरुषोत्तम करंडक, फिरोदिया करंडक अशा सांस्कृतिक क्षेत्रातील स्पर्धामध्ये तसेच क्रीडा स्पर्धामध्ये महाविद्यालयाने उल्लेखनीय यश संपादन केले. गेल्या पाच वर्षांत विविध क्रीडा स्पर्धामध्ये महाविद्यालयातील सात खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर, तर ५३ खेळाडू राष्ट्रीय आणि विद्यापीठ पातळीवर चमकले आहेत. ‘गतिमान शिक्षणातून सामाजिक परिवर्तन’ हे संस्थाचालकांचे ब्रीद महाविद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी अखंडपणे आचरणात आणत आहेत. म्हणूनच ११२ विद्यार्थ्यांनी सुरू झालेल्या महाविद्यालयामध्ये सध्या विविध ज्ञानशाखांमध्ये मिळून साडेतीन हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार हे संस्थेचे अध्यक्ष आहेत. उत्तमराव पाटील यांनी सरचिटणीस म्हणून काम करताना संस्थेच्या विकासामध्ये मोलाची कामगिरी बजावली. मा. अजित पवार आणि शशिकांत सुतार उपाध्यक्ष असून अन्य पदाधिकाऱ्यांचे संस्थेच्या प्रगतीमध्ये मोठे योगदान आहे. त्यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन वेळोवेळी लाभत असते.

  • महाविद्यालयाच्या विकासामध्ये ग्रंथालयाचे महत्त्व किती आहे असे वाटते?

महाविद्यालयाच्या सुसज्ज ग्रंथालयामध्ये विविध विषयांच्या दुर्मीळ पुस्तकांचा खजिना आहे. प्राध्यापकांबरोबरच ग्रंथसंपदा विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासामध्ये योगदान देत असते यावर संस्थाचालकांचा ठाम विश्वास आहे. एक लाखाहून अधिक ग्रंथसंग्रह हे वैशिष्टय़ असलेल्या  ग्रंथालयाचे स्वतंत्र संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. दृष्टिहीन विद्यार्थ्यांसाठी डिजिटल सॉफ्टवेअर, ब्रेल लिपीतील पुस्तके आणि बैठी आसनव्यवस्था अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नॅक मूल्यांकनात महाविद्यालयाला पुन्हा एकदा ‘अ’ दर्जा प्राप्त झाला आहे. विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) तसेच विद्यापीठ आणि महाविद्यालय विकास मंडळाच्या (बीसीयूडी) माध्यमातून वेळोवेळी चांगल्या पद्धतीचे सहकार्य लाभते

  • भविष्यातील संकल्प काय आहेत?, साठाव्या वर्षांनिमित्त भविष्यकालीन योजना कोणत्या आहेत?

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अद्ययावत, सुसज्ज आणि प्रशस्त उपाहारगृहाची सुविधा देण्याचा मानस आहे. ग्रंथालयातील वाचन कक्ष अद्ययावत करून स्पर्धा परीक्षा आणि प्रशासकीय सेवेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता २४ तास अभ्यासिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पीएच.डी. संशोधन केंद्र अद्ययावत करण्यात येणार आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील विद्यापीठांशी सामंजस्य करार करण्यात येणार असून त्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लागेल. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कौशल्य विकास अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा तसेच कौशल्यावर आधारित विविध प्रमाणपत्र आणि पदवी समकक्ष अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत.

मुलाखत- विद्याधर कुलकर्णी