‘लोकसत्ता’च्या ‘अर्थब्रह्म’चे प्रकाशन
आयुष्यातील अनिश्चितता, घटते व्याजदर आणि वाढते आयुर्मान ध्यानात घेता प्रत्येकालाच गरजेचे झालेले आर्थिक नियोजन.. करांची बचत डोळ्यासमोर ठेवून गुंतवणूक न केलेलीच बरी.. आरोग्याबरोबरच प्रत्येकाने आर्थिक आरोग्याचाही विचार करण्यासाठी तरी गुंतवणूक करावी.. कर भरूनच करता येते संपत्ती नियोजन.. अशा सोप्या भाषेत अर्थतज्ज्ञांनी मंगळवारी गुंतवणुकीचे मर्म आणि महत्त्व उलगडले.
आर्थिक आरोग्याची गुरुकिल्ली असलेल्या ‘लोकसत्ता’च्या ‘अर्थब्रह्म’ या विशेषांकाचे प्रकाशन अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर चितळे, चार्टर्ड अकौंटंट माधव गणपुले आणि शेअर बाजारविषयक तज्ज्ञ उज्ज्वल मराठे यांच्या हस्ते झाले. रिजेन्सी ग्रुप प्रस्तुत, बीएनपी पारिबास म्चुच्युअल फंड यांचे सहप्रायोजकत्व (पॉवर्ड बाय बँक ऑफ महाराष्ट्र, केसरी आणि नातू-परांजपे) असलेल्या या कार्यक्रमात वक्त्यांनी गुंतवणुकीबाबत मार्गदर्शन केले आणि उत्तरार्धात श्रोत्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत त्यांनी विषय सोप्या पद्धतीने मांडला. ‘लोकसत्ता’चे सहायक संपादक मुकुंद संगोराम यांनी प्रास्ताविकामध्ये या कार्यक्रमामागची ‘लोकसत्ता’ची भूमिका स्पष्ट केली. बीएनपी पारिबास म्चुच्युअल फंडाचे कपिल दासवाणी यांच्या हस्ते वक्त्यांचा सत्कार करण्यात आला.
‘आर्थिक नियोजनाचे महत्त्व’ सांगताना चंद्रशेखर चितळे म्हणाले, ‘अर्थ म्हणजे केवळ पैसा-अडका नव्हे तर, साधनसामग्रीचाही त्यामध्ये अंतर्भाव आहे. खूप पैसे कमावलेल्या अनेकांना नंतर नादारीला सामोरे जावे लागते. नियोजनाअभावी अर्थाची कमतरता जाणवते. त्यामुळे भविष्यकाळ उज्ज्वल करण्यासाठी नियोजन अनिवार्य झाले आहे. बचतीची नंतर योग्य गुंतवणूक केली नाही तर, उतारवयात बचतीचा उपयोग होत नाही. करांची बचत करणे हे गुंतवणुकीचे उद्दिष्ट असता कामा नये. तर, जादा निधी म्हणजेच मूल्यवर्धन हा गुंतवणुकीचा गाभा आहे. आयुष्यातील अनिश्चितता, घटते व्याजदर आणि वाढते आयुर्मान या तीन कारणांसाठी गुंतवणूक केली पाहिजे. मुदत ठेवींवरचा कमी झालेला व्याजदर ध्यानात घेता गुंतवणुकीसाठी समभाग हाच एकमेव चांगला पर्याय ठरू शकतो.’
‘म्युच्युअल फंड आणि शेअर बाजार’ यामध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे होतात. मात्र, ही गुंतवणूक करताना जोखीम पत्करण्याची तयारी ठेवली पाहिजे, असे सांगून उज्ज्वल मराठे म्हणाले, ‘विमा उतरवताना २५ वर्षे पैसे भरल्यानंतर ती रक्कम व्याजासह मिळणार. अर्थात त्यावेळी त्या पैशांची किंमत किती असेल आणि त्याचा कितपत उपयोग होईल हे ज्याचे त्याने ठरवावे. शेअर बाजार म्हणजे सट्टा हा गैरसमज आहे. ताण सहन करण्याची क्षमता नसेल तर शेअरमध्ये गुंतवणूक करण्यापासून लांब राहावे. म्यच्युअल फंडाच्या विविध योजनांमध्ये वेगवेगळे पर्याय आहेत. त्यामुळे एकाच कंपनीच्या म्युच्युअल फंडामध्ये पैसे गुंतविण्यापेक्षा वर्गीकरण करून अपेक्षित पैसे मिळतील अशा पद्धतीने गुंतवणूक करावी.’
‘कर नियोजनातून संपत्ती निर्माण’ या विषयावर माधव गणपुले म्हणाले, ‘कर हा माणसाच्या जन्मापासून तो मरेपर्यंतचा सोबती असतो. कर वाचविण्यासाठी गुंतवणूक करण्याकडे अनेकांचा कल असतो. पण, एकीकडे उत्पन्नाची गरज वाढलेली असताना कर भरून उर्वरित रक्कम आपल्याला गुंतवणुकीसाठी उपयोगात आणता येऊ शकते. उद्योगांनी करविषयक कायद्यामध्ये असलेल्या पळवाटांचा लाभ उठविला असून त्यातून सरकारही नव्याने काही गोष्टी शिकत आहे. सेवा कर हा त्यातूनच आला असून हा आता सरकारच्या उत्पन्नाचा स्रोत झाला आहे. महागाईदरापेक्षा व्याजाचे दर कमी झाले आहेत. अशा परिस्थितीमध्ये कर भरल्यानंतर हातामध्ये जास्त उत्पन्न ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
उत्तरार्धात श्रोत्यांनी अर्थतज्ज्ञांना गुंतवणुकीबाबत विविध प्रश्न विचारले. संपदा सोवनी यांनी सूत्रसंचालन केले.