‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेचे पहिले पर्व गाजवणारे पुणेकर नाटय़वेडे आता या वर्षीच्या पर्वासाठीही सज्ज झाले आहेत. तरुणाईच्या उत्साहाला, प्रायोगिकतेला योग्य व्यासपीठ देणाऱ्या या स्पध्रेची पुणे विभागाची प्राथमिक फेरी रविवारी होणार आहे. या फेरीत पुणे आणि परिसरातील २२ महाविद्यालये आपापल्या एकांकिका तालीम स्वरूपात सादर करणार आहेत. पुण्यातील स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ अभिनेते चंद्रकांत काळे यांच्या हस्ते होणार असून या फेरीसाठी स्पर्धेचे टॅलेण्ट पार्टनर असलेल्या आयरिस प्रॉडक्शनचे प्रतिनिधीही उपस्थित असतील.
पुण्यातील आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धानी राज्यभरातील नाटय़चळवळीला अनेक कलाकार मिळवून दिले. ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेनेही पुण्याच्या नाटय़वेडय़ा तरुणाईच्या मनात मानाचे आणि तितक्याच हक्काचेही स्थान मिळवले आहे. महाविद्यालयांतील तरुण लेखकांच्या प्रतिभेला आव्हान देण्यापासून ते तरुण दिग्दर्शक, कलाकार यांना आपल्यातील आविष्काराची ओळख या स्पर्धेने करून दिली. सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत आणि पृथ्वी एडिफिस यांच्या सहकार्याने होणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या स्पध्रेचे पहिले पर्व पुण्यातील कलाकारांनी गाजवले. यंदा या स्पध्रेच्या दुसऱ्या वर्षी पुण्यातील २२ महाविद्यालयांमध्ये चुरस रंगणार आहे. यातून निवडलेल्या एकांकिका पुणे विभागाच्या अंतिम फेरीत दाखल होणार आहेत. नू.म.वि. मुलींच्या शाळेत ही फेरी होणार आहे.
या स्पध्रेसाठी यंदा रेडिओ पार्टनर म्हणून ९३.५ रेड एफएमचे आणि टेलिव्हिजन पार्टनर म्हणून झी मराठी नक्षत्रचे सहाय्य लाभले आहे. ही स्पर्धा अस्तित्व या संस्थेच्या मदतीने राज्यभरातील आठ केंद्रांवर होत आहे. स्पध्रेतील प्रतिभावान कलाकारांची निवड करण्यासाठी आयरिस प्रॉडक्शन हे टॅलेण्ट पार्टनर, तर स्टडी सर्कल हे नॉलेज पार्टनर म्हणून सहभागी होणार आहेत. पुणे विभागातील प्राथमिक फेरीतील कलाकारांची पारख करण्यासाठी नाटय़, चित्रपटसृष्टीतील कलावंत आणि आयरिस प्रॉडक्शनचे प्रतिनिधी कौस्तुभ कोंडे, श्रीरंग देशमुख, अवधूत परळकर हे उपस्थित असतील.