कसदार अभिनयातून वैविध्यपूर्ण विषयांची मांडणी

वैविध्यपूर्ण विषयांचे सादरीकरण.. टाळ्या-शिट्टय़ांची दाद.. घोषणांनी दुमदुमलेले नाटय़गृह.. अशा वातावरणात लोकसत्ता लोकांकिकाची पुणे विभागीय अंतिम फेरी झाली. महाविद्यालयीन रंगकर्मीसह पुणेकर नाटय़प्रेमींनीही अंतिम फेरीतील सादरीकरणांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

‘लोकांकिका’ची प्राथमिक फेरी झाल्यानंतर विभागीय अंतिम फेरीची विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता होती. अंतिम फेरीसाठी गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांच्या जोरदार तालमी सुरू होत्या. अंतिम फेरीत स. प. महाविद्यालयाची ऐनावरम, फग्र्युसन महाविद्यालयाची टिळा, काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालयाची टॅन्जन्ट, बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाची कुणीतरी पहिलं हवं आणि मॉडर्न महाविद्यालय गणेशखिंडची कन्सेप्ट या एकांकिका झाल्या. वैविध्यपूर्ण विषयांची विद्यार्थ्यांनी केलेली मांडणी दाद मिळवणारी ठरली. सवरेत्कृष्ट ठरणाऱ्या एकांकिकेला मुंबईत होणाऱ्या महाअंतिम फेरीत सादरीकरणाची संधी मिळणार असल्याने विद्यार्थ्यांनी कसदार सादरीकरण केले.

स. प. महाविद्यालयाच्या ऐनावरम या एकांकिकेत मनोरुग्णांना मतदानाचा हक्क देण्याची कथा मांडण्यात आली होती. गेल्या काही दिवसांत  झालेल्या राजकीय नाटय़ाच्या पाश्र्वभूमीवर या एकांकिकेचा विषय महत्त्वपूर्ण होता. तर काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालयाने पैसा मिळाल्यानंतर कुटुंबातील नातेसंबंध कसे गुंतागुंतीचे होतात याची गोष्ट हलक्याफुलक्या आणि परिणामकारक पद्धतीने मांडली. तर बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाने कुणीतरी पहिलं हवं ही एकांकिको सांगीतिक करण्याचा अभिनव प्रयोग केला. पूर्वीच्या काळात स्त्री पात्र करणाऱ्या अभिनेत्याची गोष्ट संगीतमय पद्धतीने उलगडण्यात आली. त्यामुळे ही एकांकिका वेगळी ठरली. फग्र्युसन महाविद्यालयाच्या टिळा या एकांकिकेत चुकून वेश्यावस्तीत गेलेल्या एका विवाहितेला शरीरविक्रय करणाऱ्या महिलेकडून सहृदयी वागणूक मिळते आणि ती विवाहिता त्या वस्तीतून कशी बाहेर पडते ही गोष्ट मांडण्यात आली. मॉडर्न महाविद्यालय गणेशखिंडच्या कन्सेप्ट या एकांकिकेत नाटकासाठी गोष्ट शोधणारी दोन मुले एका मुलीच्या मदतीसाठी सरसावतात आणि त्यात ते कसे अडकतात, त्यांना नाटकासाठी गोष्ट मिळते का यातले नाटय़ दाखवण्यात आले. या एकांकिकांमधील विद्यार्थ्यांचा अभिनय, प्रयोगशील सादरीकरण, नाटय़पूरक तंत्रांचा वापर यामुळे प्रेक्षकांनीही भरभरून दाद दिली.

पारितोषिकाचा आनंद

विभागीय अंतिम फेरीत सादर झालेल्या पाच एकांकिकांतून काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालयाची टॅन्जन्ट ही एकांकिका मानकरी ठरली. सांघिक प्रथम पारितोषिकासह सर्वाधिक वैयक्तिक पारितोषिकेही पटकावली. त्यामुळे पारितोषिक वितरणावेळी अरे आव्वाज कुणाचा, करंडक कुणाचा अशा घोषणा देत आनंद साजरा केला आणि भरत नाटय़ मंदिर दणाणून गेले.

प्रायोजक

‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत, ‘लोकसत्ता लोकांकिका २०१९’ या स्पर्धेचे ‘मे. बी. जी. चितळे डेअरी’ आणि ‘झी टॉकिज’ हे सहप्रायोजक आहेत. तर, ‘इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड’ , ‘कमांडर वॉटरटेक प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘एम. के. घारे ज्वेलर्स’ हे पावर्डबाय पार्टनर आहेत. तसेच, ‘रणथंबोर सफारी’ आणि ‘ईशा नेत्रालय’ हे या स्पर्धेचे रिजनल पार्टनर आहेत. लोकसत्ता लोकांकिकेच्या कलाकारांना चित्रपट-मालिकेत संधी देणारे ‘आयरिस प्रॉडक्शन’ हे टॅलेंट पार्टनर असून ‘अस्तित्व’च्या सहकार्याने ही स्पर्धा पार पडत आहे.