‘लोकसत्ता’ आयोजित परिषदेचे नवे पर्व

महाराष्ट्राने काही वर्षांपूर्वी दुग्धक्रांतीचा अनुभव घेतला. अगदी दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्य़ांमधूनही दुधाचा महापूर वाहू लागला. पण या दुग्धक्रांतीने दुग्धउत्पादनाच्या विषयातील सारेच प्रश्न आणि समस्या सुटल्या असे झाले नाही. या क्षेत्राला अनेक समस्या भेडसावत आहेत आणि या क्षेत्रासमोर विविध आव्हानेही उभी आहेत. या समस्या आणि आव्हानांचा ऊहापोह करतानाच त्यावरील उपायांची चर्चा ‘लोकसत्ता मिल्क कॉन्क्लेव्ह’मध्ये होणार आहे.

दुग्धक्रांतीनंतर पुढे.. या विषयावरील ‘लोकसत्ता कॉन्क्लेव्ह’मध्ये दुग्धोत्पादनाच्या क्षेत्रातील समस्यांवर विचारमंथन होईल. माजी केंद्रीय कृषिमंत्री, ज्येष्ठ नेते शरद पवार आणि विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची या कॉन्क्लेव्हमध्ये प्रमुख उपस्थिती राहणार आहे. परिषद केवळ निमंत्रितांसाठी आहे.

दूध आणि संबंधित क्षेत्रासमोरची आजची आव्हाने कोणती, या आव्हानांवर उपाय काय, या आणि अशा विविध प्रश्नांचा मागोवा ‘लोकसत्ता कॉन्क्लेव्ह’च्या या नव्या पर्वात घेतला जाईल. महाराष्ट्रातील सहकारी आणि खासगी दूध संघांचे पदाधिकारी, या क्षेत्रातील तज्ज्ञ, अभ्यासक, अनुभवी व्यावसायिक आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती यावेळी असेल. या सर्वाच्या विचारमंथनातून दूध आणि संबंधित क्षेत्रासमोरील आव्हानांचा परामर्ष घेतला जात असतानाच त्यावरील ठोस उपायांबाबतही चर्चा होणार असल्यामुळे या परिषदेचे विशेष महत्त्व आहे.

‘बारामती अ‍ॅग्रो लिमिटेड’ प्रस्तुत ‘लोकसत्ता मिल्क कॉन्क्लेव्ह’चे ‘मारुती सुझुकी-सुपर कॅरी’ हे सहप्रायोजक आहेत. ही परिषद पॉवर्ड बाय झुझेर इंजिनिअर्स इंडिया प्रा. लि., गोविंद मिल्क अ‍ॅन्ड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि., पराग मिल्क फूड्स लि., सोनाई ग्रुप इंदापूर, एल. व्ही. डेअरीज पाटस, राजारामबापू पाटील सहकारी दूध संघ आहे.

‘लोकसत्ता मिल्क कॉन्क्लेव्ह’

  • विषय – दुग्धक्रांतीनंतर पुढे..
  • प्रमुख उपस्थिती – शरद पवार, हरिभाऊ बागडे