पुण्यात ‘लोकसत्ता रिअल इस्टेट कॉन्क्लेव्ह’

विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेल्या पुण्यामध्ये बांधकाम क्षेत्राला मोठा वाव आहे. या क्षेत्राला भेडसावणारी आव्हानेही मोठी आहेत. त्या पाश्र्वभूमीवर परवडणाऱ्या घरांची उभारणी, समूह पुनर्विकास अशा महत्त्वाकांक्षी योजनांमध्ये शासनासोबत बांधकाम उद्योगाचाही महत्त्वाचा वाटा राहणार आहे. बांधकाम क्षेत्राशी संबंधित अशा विविध प्रश्नांवर सखोल चर्चा घडवून आणण्यासाठी गुरुवारी (५ सप्टेंबर) ‘लोकसत्ता रिअल इस्टेट कॉन्क्लेव्ह २०१०’चे आयोजन करण्यात आले आहे.

राज्याचे गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. सरकार आणि बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञ यांच्यात थेट संवाद या कार्यक्रमाच्या माध्यमातून होणार आहे. या कार्यक्रमाला केवळ निमंत्रितांनाच प्रवेश देण्यात येणार आहे.

पुणे शहरात वाहतुकीची कोंडी ही एक मोठी समस्या आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी उड्डाणपूल आणि रस्त्यांचे विस्तीर्ण असे जाळे विणण्याचे प्रकल्प आखले जात असून त्यातून येथील बांधकाम क्षेत्राला उभारी मिळेल असा प्रयत्न आहे. पिंपरी-चिंचवड आणि शहराच्या उपनगरांमध्ये औद्योगिक वसाहतींची आखणी करण्यासोबतच नव्या आणि नियोजनबद्ध अशा शहरांची उभारणी करण्याचे विचार बोलून दाखविले जात आहेत. एकीकडे या नागरीकरणाला योग्य दिशा मिळावी यासाठी प्रयत्न होत असले तरी पायाभूत सुविधांच्या आघाडीवर गेल्या अनेक वर्षांपासून केले गेलेले दुर्लक्ष, जागोजागी उभी राहिलेली बेकायदा बांधकामे आणि त्या माध्यमातून निर्माण झालेले प्रश्न येथील बांधकाम उद्योगाला अधूनमधून सतावत आहेत.

पुण्यातील रस्त्यांवर दररोज होणारी वाहतूक कोंडी, इप्सित स्थळी पोहोचण्यास लागणारा वेळ, प्रवासासाठी असलेली मर्यादित साधने, पुरेशा नियोजनाअभावी काही ठिकाणी भेडसावणारी पाणीटंचाई यांसारखी संकटे मोडीत काढण्याचे आव्हान येथील ‘पीएमआरडीए’ समोर आहे. शहरामधील बांधकाम व्यवसायाला विविध अडथळ्यांचा सामना करावा लागतो. आव्हानांची मोठी यादी या उद्योगापुढे असली तरी विस्तीर्ण अशी मोकळी जमीन, मुंबईच्या तुलनेत स्वस्त घरांचा पर्याय, नव्या विकास प्रकल्पांची होत असलेली पेरणी यामुळे या व्यवसायाला वाढीची मोठी संधीही या भागात आहे. या आणि अशा अनेक विषयांवर सखोल चर्चा या कॉन्क्लेव्हमध्ये होणार आहे. पुण्याचा विकास आणि परवडणाऱ्या घरांची उभारणी, समूह विकास योजना यांसारख्या विषयांनाही यानिमित्ताने हात घातला जाणार आहे.

गॅ्रव्हिट्स कॉर्प प्रस्तुत

‘लोकसत्ता रिअल इस्टेट कॉन्क्लेव्ह २०१९’

  • सहप्रायोजक : सह्य़ाद्री इंडस्ट्रिज लि. (इको प्रो)
  • पॉवर्ड बाय : प्राइड वर्ल्ड सिटी, लिटिल अर्थ (मासुळकर सिटी), भरूचा अँड कंपनी