पुण्यात उद्या ‘लोकसत्ता रिअल इस्टेट कॉन्क्लेव्ह’

पुणे : विद्येचे माहेरघर आणि सांस्कृ तिक राजधानी अशी ओळख असलेल्या पुण्यामध्ये गुरुवारी (५ सप्टेंबर) ‘लोकसत्ता रिअल इस्टेट कॉन्क्लेव्ह २०१९’मध्ये विकास आराखडय़ावर व्यापक चर्चा होणार आहे. पुणे आणि िपपरी-चिंचवडमधील बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञ आणि महाराष्ट्र सरकार यांची थेट चर्चा हे ‘लोकसत्ता रिअल इस्टेट कॉन्क्लेव्ह २०१९’चे वैशिष्टय़ आहे.

बांधकाम क्षेत्राशी संबंधित अशा विविध प्रश्नांवर सखोल चर्चा घडवून आणण्यासाठी ‘लोकसत्ता रिअल इस्टेट कॉन्क्लेव्ह २०१९’चे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. पुणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव, िपपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर आणि ‘स्मार्ट सिटी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप यांची या वेळी उपस्थिती असेल.

सरकार आणि बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञ यांच्यात थेट संवाद या कार्यक्रमाच्या माध्यमातून होणार आहे. या कार्यक्रमाला केवळ निमंत्रितांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. पुण्यामध्ये बांधकाम क्षेत्राला मोठा वाव आहे आणि या क्षेत्राला भेडसावणारी आव्हानेही मोठी आहेत. त्या पाश्र्वभूमीवर परवडणाऱ्या घरांची उभारणी, समूह पुनर्विकास अशा महत्त्वाकांक्षी योजनांमध्ये शासनासोबत बांधकाम उद्योगाचाही महत्त्वाचा वाटा राहणार आहे.

पुणे शहरात वाहतुकीची कोंडी ही समस्या आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी उड्डाणपूल आणि रस्त्यांचे विस्तीर्ण असे जाळे विणण्याचे प्रकल्प आखले जात असून त्यातून येथील बांधकाम क्षेत्राला उभारी मिळेल असा प्रयत्न आहे. िपपरी-चिंचवड आणि शहराच्या उपनगरांमध्ये औद्योगिक वसाहतींची आखणी करण्यासोबतच नव्या आणि नियोजनबद्ध अशा शहरांची उभारणी करण्याचे विचार बोलून दाखविले जात आहेत. एकीकडे या नागरीकरणाला योग्य दिशा मिळावी यासाठी प्रयत्न होत असले तरी पायाभूत सुविधांच्या आघाडीवर गेल्या अनेक वर्षांपासून केले गेलेले दुर्लक्ष, जागोजागी उभी राहिलेली बेकायदा बांधकामे आणि त्या माध्यमातून निर्माण झालेले प्रश्न येथील बांधकाम उद्योगाला अधूनमधून सतावत आहेत.

पुण्यातील रस्त्यांवर दररोज होणारी वाहतूक कोंडी, त्यामुळे इप्सित स्थळी पोहोचण्यास लागणारा अतिरिक्त वेळ, प्रवासासाठी असलेली मर्यादित साधने, पुरेशा नियोजनाअभावी काही ठिकाणी भेडसावणारी पाणीटंचाई यांसारख्या संकटांवर उपाय शोधण्याचे आव्हान येथील ‘पीएमआरडीए’ समोर आहे.

शहरामधील बांधकाम व्यवसायाला विविध अडथळ्यांचा सामना करावा लागतो. आव्हानांची मोठी यादी या उद्योगापुढे असली तरी विस्तीर्ण अशी मोकळी जमीन, मुंबईच्या तुलनेत स्वस्त घरांचा पर्याय, नव्या विकास प्रकल्पांची होत असलेली पेरणी यामुळे या व्यवसायाला वाढीची मोठी संधीही या भागात आहे. या आणि अशा अनेक विषयांवर सखोल चर्चा या कॉन्क्लेव्हमध्ये होणार आहे. पुण्याचा विकास आणि परवडणाऱ्या घरांची उभारणी, समूह विकास योजना यांसारख्या विषयांनाही यानिमित्ताने हात घातला जाणार आहे.

…प्रायोजक…

ग्रॅव्हिट्स कॉर्प प्रस्तुत

‘लोकसत्ता रिअल इस्टेट कॉन्क्लेव्ह २०१९’

सहप्रायोजक :

सह्य़ाद्री इंडस्ट्रीज लि. (इको प्रो)

पॉवर्ड बाय :

प्राइड वर्ल्ड सिटी, लिटिल अर्थ (मासुळकर सिटी), भरूचा अँड कंपनी