महाराष्ट्राच्या सामाजिक आणि आर्थिक जडणघडणीत सहकारी साखर कारखान्यांचे योगदान आजही महत्त्वाचे मानले जाते. कारखान्यांच्या माध्यमातून शिक्षण संस्था, ग्राहक भांडार, दूध संघ, कुक्कुटपालन संस्था अशा अनेक संस्थांचे जाळेच राज्यात निर्माण झाले आणि त्याद्वारे ग्रामीण विकासाला मोठा हातभार लागला. परंतु, या कारखानदारीवर आलेले आर्थिक आणि व्यावसायिक संकट ही आता गंभीर बाब बनली आहे. कारखान्यांच्या समस्यांवर उत्तर शोधण्यासाठी ‘लोकसत्ता’तर्फे सोमवारी, २० जानेवारीला पुण्यात साखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती हे या परिषदेचे वैशिष्टय़ आहे. या परिषदेत विशेष मार्गदर्शन करण्यासाठी  पवार यांच्याबरोबरच, राज्याचे कामगार व उत्पादन शुल्कमंत्री दिलीप वळसे-पाटील, महाराष्ट्र राज्य साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर आणि राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे हे तज्ज्ञ परिषदेस उपस्थित राहणार आहेत. राज्याच्या विविध भागांतील साखर कारखान्यांच्या पदाधिकाऱ्यांनी या परिषदेस उपस्थित राहण्यासाठी पुढाकार घेतला असून त्यामुळे सर्वसमावेशक चर्चा घडून येण्यास मदत होणार आहे.

देशातील सहकारी साखर कारखाने बंद पडू लागले असून खाजगी कारखानदारी वाढते आहे. अनेक कारखान्यांमध्ये कामगारांचे वेतनही थकले आहे. बँकांनी केलेली गुंतवणूकही बंद कारखान्यांमुळे अडचणीत येऊ लागली आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे जगभरात साखरेचा वापर कमी होत चालला असून सेंद्रिय साखरेच्या निर्मितीला प्राधान्य मिळत आहे. अशा परिस्थितीत साखर कारखाने अडचणीत येऊ लागले आहेत. या आणि अशा अनेक प्रश्नांचा उहापोह करून त्यातून मार्ग काढण्यासाठी ही साखर परिषद निश्चितच उपयोगी ठरणार आहे.

* टायटल पार्टनर : एस.एस. इंजिनीयर्स

* असोसिएट पाटर्नर : रावेतकर, प्राज इंडस्ट्रीज लि. व मारुती सुझुकी – सुपर कॅरी

* पॉवर्ड बाय : श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना लि., शिरोळ जिल्हा कोल्हापूर, इंडियाना सुक्रो—टेक (पुणे) प्रा. लि.,  महाराष्ट्र राज्य साखर संघ लि., सुवीरॉन इक्विपमेंट्स प्रा. लि.,  भीमाशंकर सहकारी साखर कारखाना लि., एक्सेल इंजिनीअरिंग, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखाना लि. संगमनेर

* बँकिंग पार्टनर : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित