‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ उपक्रमासाठी नोंदणी ८ फेब्रुवारीपर्यंत

पुणे : तरुणाईमधील नव्या उपक्रमांची आणि ते करण्यासाठी धडपडणाऱ्या तरुणांची सन्माननीय दखल घेणाऱ्या ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ उपक्रमाच्या तिसऱ्या पर्वाची नोंदणी सुरू झाली आहे. येत्या ८ फेब्रुवारीपर्यंत संकेतस्थळावर नोंदणी आणि शिफारस करता येणार आहे.

नवकल्पना आणि जिद्दीच्या आधारे कर्तृत्वाचे नवे क्षितिज गाठणाऱ्या तरुण-तरुणींचा शोध ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ उपक्रमातून घेण्यात येतो. विज्ञान, तंत्रज्ञान, सामाजिक कार्य, क्रीडा, साहित्य, कला इत्यादी क्षेत्रांमध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या तरुणाईमुळे ती क्षेत्रे समृद्ध होतात. त्याचबरोबर त्या क्षेत्रांमध्ये नव्याने येऊ पाहणाऱ्यांसमोरही भक्कम आदर्श निर्माण होतात. असे आदर्श निर्माण करणाऱ्या तरुणाईचा शोध सुरू झाला असून नोंदणीसाठी प्रवेशपत्रिका ऑनलाइन भरणे अनिवार्य आहे.

समाजमाध्यमांवर विचार करणारे तरुण एका बाजूला आणि ‘बदलाची सुरुवात  आपल्यापासून होते’, असा विचार करून त्यावर कृती करणारे सर्जक एका बाजूला. या दुसऱ्या वर्गाप्रमाणे विचारांना कृतीची जोड देत परिस्थिती बदलू पाहणारी तरुणाई आपल्या आसपास असते. कामावर निष्ठा आणि विवेकबुद्धीच्या आधारे जे आपल्या क्षेत्रात घट्ट पाय रोवून उभे आहेत, त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा ठसा त्या त्या क्षेत्रावर उमटला आहे. अशा तरुणाईला ‘लोकसत्ता’च्या व्यासपीठावरून थोरामोठय़ांकरवी कौतुकाची दाद मिळावी, त्याच्यातील सकारात्मकतेला वाव मिळावा, त्यांचा संघर्ष, यश समाजासमोर यावे हा ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ उपक्रमाचा उद्देश्य आहे.

विविध क्षेत्रांत नवे मानदंड निर्माण करणाऱ्या तरुणांच्या कष्टाचे, प्रज्ञेचे कौतुक ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ उपक्रमातून करण्यात येते. गेल्या दोन वर्षांत या उपक्रमांतर्गत २६ तरुण ऊर्जावंतांचा गौरव करण्यात आला. त्यामध्ये अनाथ, अपंगांसाठी धडपडणारे, कायद्याच्या माध्यमातून जनआंदोलनाचा आधार ठरणारे, तिरस्कृतांचे जीवन जगणाऱ्या तृतीयपंथीयांची सखी होऊन त्यांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करणारे, विज्ञान-तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात ठोस काम करून सर्वसामान्यांचे आयुष्य सुकर करण्यासाठी धडपडणारे अशा विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असणाऱ्या तरुणाईला गौरवण्यात आले.

प्रवेश अर्ज कसा भराल?

या पर्वाच्या निवड प्रक्रियेचे तपशील  https://taruntejankit.loksatta.com/  येथे पाहायला मिळतील. या ठिकाणी असलेली प्रवेश पत्रिका ऑनलाइन भरून पाठवणे अनिवार्य आहे. त्याचबरोबर आपल्या भवताली दिसणाऱ्या गुणवंत तरुणांची नावे माहितीसह सुचवताही येणार आहे.

प्रायोजक

तरुणाईच्या गौरवाचा हा सोहळा ‘केसरी टूर्स’ पुरस्कृत आहे. सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक या उपक्रमाचे सहप्रायोजक आहेत, तर ‘एम. के. घारे ज्वेलर्स’ हे ‘पॉवर्ड बाय’ पार्टनर आहेत. या कार्यक्रमाचे ‘नॉलेज पार्टनर’ पीडब्ल्यूसी हे आहेत.