‘मला माझं म्हणणं मांडायचं आहे..’ या तरुणाईत सतत खदखदणाऱ्या भावनेला शुक्रवारी आवाज मिळाला. निमित्त होते नाथे समूह प्रस्तुत आणि पृथ्वी एडिफाइसच्या सहकार्याने लोकसत्ताने आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे! ‘नायकांना देव्हाऱ्यात बसवण्यामागील सामाजिक दांभिकतेवरची टीका ते सवंग मनोरंजनाच्या अधीन झाल्याच्या कबुलीपर्यंत; वैश्विक राष्ट्राच्या संकल्पनेच्या व्यवहार्यतेपासून ते राजकीय स्वार्थासाठी चालणाऱ्या चळवळींचे विश्लेषण.. असे विचारमंथन हे या स्पर्धेचे वैशिष्टय़ ठरले. पुणे विभागाच्या प्राथमिक फेरीतील ८३ स्पर्धकांमधून १५ स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली.

नाथे समूह प्रस्तुत आणि पृथ्वी एडिफाइसच्या सहकार्याने लोकसत्ताने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची पुणे विभागाची प्राथमिक फेरी मोठय़ा उत्साहात आणि तितक्याच खेळीमेळीच्या वातावरणात झाली. या स्पर्धेसाठी जीवन विमा निगम, जनकल्याण बँक आणि तन्वीशता यांचेही सहकार्य मिळाले आहे. सध्याच्या राजकीय, सामाजिक विषयांकडे पाहण्याचा तरुणाईचा दृष्टिकोन, भूतकाळातील घटनांचे त्यांनी लावलेले अन्वयार्थ आणि परिस्थितीची चिकित्सा करण्याची क्षमता असे तरुणाईचे पैलू या स्पर्धेच्या निमित्ताने उलगडत गेले.
पुणे विभागाच्या प्राथमिक फेरीला विद्यार्थ्यांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला, त्यामुळे स्पर्धेतील चुरस वाढली होती. या फेरीत ८३ विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडले. त्यातील १५ स्पर्धकांची पुणे विभागीय अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. पुणे शहरातील महाविद्यालयांबरोबरच सोलापूर, सांगली, कराड, बारामती, दौंड, लोणावळा येथील विद्यार्थीही सहभागी झाले होते. या फेरीसाठी डॉ. समीरण वाळवेकर, डॉ. उज्ज्वला बर्वे, डॉ. गणेश राऊत, नीलिमा बोरवणकर यांनी परीक्षण केले. स्पर्धकांचा उत्साह, परखड विचार यांबरोबरच दाद द्यावी अशी खिलाडू वृत्ती यांमुळे स्पर्धा उत्तरोत्तर रंगत गेली.

नगरमध्येही उत्साह
स्पर्धेच्या नगर केंद्रावरील प्राथमिक फेरीही शुक्रवारी उत्साहात पार पडली. नगर केंद्रावरील प्राथमिक फेरीत २७ स्पर्धक सहभागी झाले होते. त्यातून आदित्य कुलकर्णी, अफसर शेख, अशोक शिंदे, प्रियंका वाईकर, नागेश गवळी, कविता देवढे, अर्चना आव्हाड आणि कोमल गायकवाड हे आठ जण विजेते ठरले.