उपनगरीय सेवेबाबत रेल्वे सकारात्मक; डिझेल की विजेवरील गाडी यावर मतभेद

पुणे : पुणे ते लोणावळा या मार्गावर सध्या सुरू असलेल्या रेल्वेच्या उपनगरीय वाहतुकीप्रमाणे लोणावळ्यापासून थेट दौंडपर्यंत उपनगरीय वाहतूक सुरू करण्याबाबत रेल्वे प्रशासन सकारात्मक आहे. या मार्गासाठी डिझेलवर चालणाऱ्या डेमू गाडीची मागणी रेल्वेने नोंदविली आहे. मात्र, पुणे ते दौंड लोहमार्गाचे विद्युतीकरण होऊनही या मार्गावर डिझेल गाडीचा अट्टाहास का, असा प्रश्न प्रवासी संघटनांकडून उपस्थित केला जात असून, या मार्गावर विजेवर धावणारी मेमू लोकल सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.

पुणे ते लोणावळा या मार्गावर रेल्वेच्या ईएमयू लोकलमधून सेवा दिली जाते. या सेवेला आता चाळीसहून अधिक वर्षांचा कालावधी लोटला आहे. पुणे ते लोणावळा या पट्टय़ातील पिंपरी-चिंचवडमधील औद्योगिक नगरी ते मावळमधील विविध विभागांना जोडण्यासाठी ही सेवा महत्त्वाची ठरली आहे. दररोज सव्वा लाखांहून अधिक प्रवासी या सेवेचा लाभ घेतात. त्यात विद्यार्थी, नोकरदार आणि व्यावसायिकांचा समावेश अधिक आहे. दुसरीकडे पुणे ते दौंड या मार्गावर सध्या डिझेलवर चालणाऱ्या डेमू गाडीची सेवा देण्यात येत आहे. दौंड, यवत आदी पट्टय़ातून पुणे शहरात शिक्षण किंवा नोकरीच्या निमित्ताने दररोज येणाऱ्या प्रवाशांसाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त आहे. पुणे ते दौंड या मार्गाचे तीन वर्षांपूर्वी विद्युतीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. विद्युतीकरण झाल्यानंतर या मार्गावर पुणे ते लोणावळाप्रमाणे विजेवर धावणारी गाडी सुरू करण्याचे सूतोवाच रेल्वेने केले होते. मात्र, प्रत्यक्षात या मार्गावर डिझेलवरील गाडी सुरू करण्यात आल्याने प्रवाशांमध्ये अद्यापही नाराजी आहे.

दौंडच्या पट्टय़ातील अनेक प्रवाशांना थेट पिंपरी-चिंचवड, लोणावळा किंवा मावळ पट्टय़ातही नोकरी किंवा व्यावसायाच्या निमित्ताने पोहोचावे लागते. सध्या या प्रवाशांना पुणे स्थानकावरून गाडी बदलावी लागते. ती आवश्यक वेळेत मिळत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होते. त्यामुळे थेट दौंड ते लोणावळा या मार्गावर उपनगरीय वाहतूक सुरू करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जात आहे. दौंड-पुणे-दौंड प्रवासी संघाने त्यासाठी पुढाकार घेतला आहे. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी नुकतीच पुणे स्थानकाला भेट दिली. त्या वेळी त्यांनी या सेवेबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली. त्यासाठी डेमू गाडीची मागणी नोंदविली असल्याचे आणि ती मिळाल्यास सेवा सुरू करण्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. मात्र, या मार्गावर विजेवर धावणारी मेमू लोकल प्रवाशांना अधिक सोयीची ठरणार असल्याने या गाडीबाबत प्रवासी संघटनांनी भूमिका मांडली.

दौंड ते लोणावळा मार्गावर थेट उपनगरीय वाहतूक ही हजारो प्रवाशांची गरज आहे. मात्र, या मार्गावर विजेवर धावणारी मेमू गाडी सुरू होणे आवश्यक आहे. तीन वर्षांपूर्वी पुणे ते दौंड मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले असतानाही या मार्गावर डिझेलच्या गाडय़ा का सोडल्या जातात, हा एक प्रश्नच आहे. विद्युत लोकल सुरू न झाल्याने आजवर रेल्वेचे सुमारे २४ कोटींच्या आसपास नुकसान झाल्याचे गणित आपण अभ्यासपूर्वक रेल्वेपुढे मांडले आहे.

– विकास देशपांडे, दौंड-पुणे-दौंड प्रवासी संघ सचिव/ विभागीय रेल्वे सल्लागार समिती सदस्य