लोणावळा शहर परिसरात मागील ४८ तासात ६३३ मीली मीटर पावसाची नोंद झाली आहे. शुक्रवार आणि शनीवारी पावसाने लोणावळा आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये जोरदार हजेरी लावली.  मागील दोन दिवसांमध्ये लोणावळा शहराला अक्षरशः झोडपून काढल्यानंतर आज (रविवार) सकाळपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. जोरदार पावसामुळे या विकेण्डला भुशी धरणाकडे जाणारी गर्दी ओसरल्याचे चित्र दिसत होते. अखेर आज पावसाने विश्रांती घेतल्यानंतर भुशी धरणाकडे जाणार मार्ग लोणावळा पोलिसांनी खुला केला आहे. मात्र, धरणाच्या पायऱ्यांवरून येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाचा वेग प्रचंड असल्याने पर्यटकांनी काळजी घ्यावी असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील यांनी केले आहे. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी खंडाळा प्रवेशद्वार, वलवण प्रवेशद्वार येथून घुबड तलावापर्यंत पोलिसांचा विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

लोणावळा शहर आणि ग्रामीण परिसरात गेल्या ४८ तासात मुसळधार पाऊस कोसळला आहे. शनिवार रविवारची सुट्टी आणि त्यात धो धो पडणारा पाऊस यामुळे लोणावळा परिसरातील सर्व पर्यटनस्थळे गर्दीने फुलून गेली आहेत. तलाव आणि धरणे ओसंडून वाहत आहेत. मात्र पावसाचा जोर पाहता लोणावळ्यामधील भुशी धरणाकडे जाणारा मार्ग शुक्रवारपासून बंद करण्यात आला होता. अखेर आज सकाळी तो मार्ग पर्यटकांसाठी पुन्हा खुला करण्यात आला आहे. मात्र पाण्याचा जोर पाहता पर्यटकांनी काळजी घ्यावी असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

दरम्यान, इंद्रायणी नदी देखील दुथडी वाहात असून पूर स्थिती निर्माण झालेले आहे. ग्रामीण परिसरातही जोरदार पाऊस झाल्याने अनेक शेतांमध्ये पाणी साठल्याचे चित्र दिसत आहे. तर शहरातील देखील अशीच काहीशी परिस्थिती आहे. लोणावळा शहरात अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरले आहे. यामुळे सततच्या पावसाने लोणावळ्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहर आणि ग्रामीण भागात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळेच अनेक पूल पाण्याखाली गेल्याने काही गावांचा संपर्कही तुटला आहे.

नक्की पाहा >> लोणावळा : भुशी धरणाच्या पायऱ्यांवर अडकलेल्या तरुणांना वाचवण्यात यश

लोणावळ्यातील पर्यटनस्थळी काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी एकूण १२५ पोलीसांचा बंदोबस्त वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आला आहे. यात पोलीस कर्मचारी, पोलिस मित्र, ट्राफिक वार्डन्स, स्वयंसेवक रस्त्यावर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत.