मुंबई-पुण्यातील प्रत्येक पर्यटकांचं आवडीच ठिकाण असलेलं लोणावळ्यातील भुशी धरण ओव्हर फ्लो झालं असून धरणाच्या पायऱ्यांवरून पाणी ओसंडून वाहत आहे. परंतु, गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी देखील पर्यटकांना या धरणावर जाऊन भिजण्याच्या आनंदाला मुकावं लागणार आहे. या ठिकाणी पर्यटनस्थळी पर्यटकांना येण्यास बंदी आहे. मात्र, तरी अनेक पर्यटक बंदी झुगारून थेट भुशी धरणापर्यंत पोहचल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे.

नक्की पाहा >> Photos : पोलीस विरुद्ध स्थानिक गोंधळामुळे भुशी डॅमवर पर्यटकांची धावपळ

पुणे आणि मुंबईकरांच हक्काचं आणि आवडीचं पर्यटनस्थळ असलेलं भुशी धरण ओव्हर फ्लो झालं आहे. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी धरण खूप अगोदर भरल्याने पर्यटकांची पावलं आपसूकच धरणाच्या दिशेने पडत आहेत. गेल्या आठवडाभरापासून लोणावळा परिसरात मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी सतत कोसळत आहेत. याचमुळे लोणावळ्याचा परिसर अत्यंत नयनरम्य झाला असून डोंगर दऱ्या हिरवा शालू परिधान केल्याचा भास झाल्याशिवाय राहात नाही. सहयाद्रीच्या पर्वतरांगांच्या डोंगरकड्यांमधून छोटे मोठे धबधबे कोसळत असून त्याचा आनंद पर्यटक घेत आहेत.

नक्की पाहा फोटो >> लोणावळा : पाऊस, लाँग ड्राइव्ह, धबधबे अन् मक्याचं कणीस… Picnic Day चा परफेक्ट प्लॅन

गेल्या वर्षीपासून करोना महामारीच संकट असून याचमुळे अद्याप या पर्यटनस्थळांवर भटकंती करण्यास नागरिकांना मज्जाव घालण्यात आला आहे. गेल्या रविवारी लोणावळ्याच्या सहारा पुलापाशी पर्यटकांनी एकच गर्दी केली होती. अक्षरशः लोणावळा पोलिसांना विनवणी करून त्यांना परत पाठवाव लागलं होतं. त्यामुळे लोणावळ्यातील पर्यटनस्थळी येण्याअगोदर एकदा नक्की विचार करणं गरजेचं आहे.