प्रवाशांची वाढती मागणी असलेल्या पुणे- दौंड रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम अंतिम टप्पात आले असून, हे काम लवकरच पूर्ण होणार आहे. त्यामुळे आता लोणावळा-पुणे-दौंड अशी लोकलसेवा सुरू होऊ शकणार आहे. या मार्गावर लोकलसेवा सुरू झाल्यास लोणावळा ते दौंड या पट्टय़ातील नागरिकांना त्याचा फायदा होऊ शकणार आहे.
पुणे रेल्वे स्थानक आंतरराष्ट्रीय करण्याची भाषा करण्यात येत असताना दुसऱ्या बाजूला पुणे- दौंड मार्गावर मात्र विद्युतीकरणही नव्हते. या टप्प्यात इंधनावर गाडय़ा चालविल्या जातात. त्यामुळे या मार्गाचे विद्युतीकरण करून गाडय़ांची संख्या वाढविण्याची मागणी मागील १५ ते २० वर्षांपासून सातत्याने प्रवासी संघटनांकडून करण्यात येत होती. मात्र, या कामाकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत होते.
सहा वर्षांपूर्वी हा विषय रेल्वे अर्थसंकल्पात येऊन त्याला मान्यताही देण्यात आली. मात्र, त्यानंतर निधी उपलब्ध नसल्याचे कारण सांगून हे काम रखडविण्यात आले. अखेर दीड वर्षांपूर्वी या कामासाठी निधी उपलब्ध झाला व काम सुरू करण्यात आले. पुणे- दौंड मार्गावरील वाहतूक सुरू ठेवून हे काम करण्यात येत असल्याने या कामाला काहीसा विलंब होत आहे. मात्र, सध्या हे काम अंतिम टप्प्यात असून, लवकरच पूर्ण होऊ शकेल. त्यामुळे याच वर्षांमध्ये या मार्गावर लोकल सेवा सुरू होऊ शकेल, असा विश्वास रेल्वेच्या सूत्रांनी व्यक्त केला.
पुणे- दौंड मार्गावर सध्या प्रवाशांची संख्या वाढते आहे. रेल्वे मार्गालगतच्या भागातून पुण्यामध्ये शिक्षणासाठी येणारे विद्यार्थी, तसेच कामगार व व्यावसायिकांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. पुणे- सोलापूर मार्गावरील प्रवासाऐवजी रेल्वेच्या प्रवासाला प्राधान्य दिले जाते. अशा परिस्थितीत या मार्गावर धावणाऱ्या रेल्वेच्या पॅसेंजर व एक्स्प्रेस गाडय़ांमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी दिसून येते. गाडय़ांमध्ये अक्षरश: पाय ठेवायलाही जागा मिळत नाही. अशा वेळी अनेकदा वादावादीचे प्रसंग निर्माण होतात. त्यामुळे गाडय़ांची संख्या वाढविण्याची मागणी होत आहे. प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता त्याचा फायदा रेल्वेलाच होणार आहे. हे लक्षात घेऊन विद्युतीकरणाचे काम करण्यात येत आहे.
विद्युतीकरण पूर्ण झाल्यास अनेक समस्या सुटू शकणार आहेत. या मार्गावर लोकलची सेवा सुरू होण्याबरोबरच इतर गाडय़ांचा वेग वाढल्यानंतर वाचलेल्या वेळामध्ये नवी गाडी सुरू करता येईल. पुणे ते दौंडच्या पट्टय़ातून पुण्यात रोज येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यांना लोकलचा मोठा फायदा होऊ शकेल.