लोणावळ्याच्या जयचंद चौकात ७ सप्टेंबरला धारदार शस्त्राच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले मावळमधील आपटी गेव्हेंडे ग्रामपंचायतीचे सदस्य आनंद धोंडू शिंगाडे (वय ३३, रा. आतवण, ता. मावळ) यांचा रविवारी उपचारांदरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे लोणावळ्यात तणाव निर्माण झाला असून, पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
शिंगाडे यांच्यावर ७ सप्टेंबरला भरचौकात दुपारी एकच्या सुमारास चॉपरने वार करण्यात आले होते. या प्रकरणी आमन रियाज ऊर्फ लादेन अन्सारी, शाहरूख अस्लम खान, रियाज अन्सारी (सर्व रा. लोणावळा) यांना अटक करण्यात आली असून, एका अल्पवयीन मुलाला बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे.
लोणावळ्याजवळील आपटी गेव्हेंडे ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये येणाऱ्या लायन्स पॉईंट येथील व्यवसायावरून अन्सारी बंधू व शिंगाडे यांच्यामध्ये वाद होता. अन्सारी हा हॉटेलच्या नावाखाली लायन्स पॉईंटवर अवैध धंदे चालवित असल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी त्याला विरोध केला होता. अन्सारी याने यापूर्वी या ठिकाणी दहशत माजवत स्थानिक नागरिकांना मारहाणही केली होती. याच प्रकरणातून शिंगाडे यांच्यावर हल्ला झाला. या घटनेनंतर रामनगर, आवतान ग्रामस्थ व शिवसेनेच्या वतीने पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून आरोपींवर कडक कारवाईची मागणी करण्यात आली होती.
शिंगाडे यांच्या मृत्यूची बातमी समजताच लोणावळ्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कायदा सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी पोलिसांनी तातडीने बंदोबस्तात वाढ केली. लोणावळ्याच्या ग्रामीण भागामध्ये पोलिसांच्याच हितसंबंधातून मोठय़ा प्रमाणावर अवैध धंदे सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडू करण्यात येत आहे. ‘लोकसत्ता’ ने रविवारच्याच अंकात लायन्स पॉईंटवरील अवैध धंदे व रात्री घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांवर प्रकाश टाकला आहे. पोलीस प्रशासनाने आता तरी अवैध धंदे व गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.