पुणे विद्यापीठाच्या पैशाला सध्या अनेक मार्गाने पाय फुटले आहेत. विद्यापीठाच्या अधिकार मंडळाचे काही सदस्य, अधिष्ठाता यांच्याकडून भत्त्यांच्या स्वरूपात विद्यापीठाला लुटले जात आहे. विद्यापीठाच्याच वसतिगृहांमध्ये राहून वर विद्यापीठाकडून दैनिक भत्ता घेण्याचे प्रकार सुरू आहेत. विद्यापीठाच्या सभांना उपस्थित राहण्यासाठी वर्षांला साधारण लाखाच्या घरात प्रवास भत्ते घेण्यात येतात. विशेष म्हणजे विद्यापीठाच्या अभ्यागत निवासस्थानामध्ये कोण किती काळ राहून गेले याचीही नोंद ठेवली जात नसल्याचे माहिती अधिकाराच्या माध्यमातून समोर आले आहे.
पुणे विद्यापीठाच्या अधिकार मंडळातील सदस्यांना विद्यापीठाच्या विविध सभांसाठी उपस्थित राहण्यासाठी प्रवास भत्ता आणि बाहेरगावी बैठक असल्यास दैनिक भत्ता दिला जातो. त्याशिवाय बैठकीला उपस्थित राहिल्यास मानधनही दिले जाते. विद्यापीठाच्या नियमानुसार विद्यापीठाच्या अभ्यागत निवासस्थानांमध्ये राहणाऱ्या सदस्यांना दैनिक भत्ता देता येत नाही. मात्र, विद्यापीठाच्याच अभ्यागत कक्षात राहूनही काही सदस्य दैनिक भत्ता घेत आहेत. विशेष म्हणजे विद्यापीठाच्या अभ्यागत निवासस्थानामध्ये कोण किती कालावधीसाठी राहून गेले याची नोंदच उपलब्ध नसल्याचे माहिती अधिकारामध्ये विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले आहे.
जी बाब दैनिक भत्त्यांची तोच प्रकार प्रवास भत्त्यांचाही आहे. विद्यापीठाच्या गाडय़ा वापरून वर प्रवास भत्ते घेतले जातात. उपलब्ध झालेल्या माहितीनुसार वर्षांला दीड ते दोन लाख रुपये फक्त प्रवास भत्त्यांपोटी विद्यापीठाकडून घेतले जात आहेत. पुणे विद्यापीठाच्या अभियांत्रिकी शाखेच्या अधिष्ठात्यांबाबत अशाच प्रकारची माहिती पुढे आली आहे. या अधिष्ठात्यांनी चार वर्षांमध्ये प्रवासभत्ता आणि दैनिक भत्त्यांपोटी जवळपास पाच लाख रुपये विद्यापीठाकडून उकळले आहेत. मात्र, या अधिष्ठात्यांचे उदाहरण हे विद्यापीठातील अनेक उदाहरणांपैकी एक आहे.