बालपणीच हरपलेले आईचे छत्र.. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या बाल संगोपन केंद्राने दिलेली मायेची छाया.. प्रतिकूलतेवर मात करून बारावीनंतर केलेला हॉटेल मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम.. चेन्नई येथील ‘हॉटेल ताज’ आणि मुंबई येथील ‘हॉटेल ओबेरॉय’ या आलेल्या संधी.. ‘ही तर बाप्पाची कृपा’ अशा भावना आहे सुनील शेरेकर या युवकाची.
कर्नाटकातील बिदर तालुक्यातील वलिखडी या गावच्या सुनीलची ही कथा. वयाच्या चौथ्या वर्षीच आईचे निधन झाले. कामाच्या शोधात वडील पुण्यात आले. त्यांच्याबरोबर आलेली सुनील आणि अनिल ही दोन भावंडे दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या कोंढवा येथील बाल संगोपन केंद्रामध्ये दाखल झाली. महापालिकेच्या संत गाडगेमहाराज शाळेत सुनील सातवी उत्तीर्ण झाला. कोंढव्यातील दुगड हायस्कलमध्ये दहावीपर्यंतचे शिक्षण झाल्यावर कॅम्प एज्युकेशन सोसायटी येथे व्यावसायिक शिक्षण घेऊन तो बारावी झाला. ट्रस्टच्या सहकार्याने त्याने हॉटेल मॅनेजमेंट हा तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केला. आता कॅम्पस इंटरव्ह्य़ू होऊन त्याची चेन्नई येथील ‘हॉटेल ताज’साठी निवड झाली आहे. पण, आजारी वडिलांची सेवा करता यावी यासाठी मी मुंबईच्या हॉटेल ओबेरॉय येथून आलेली संधी स्वीकारायची असे ठरविले असल्याचे त्याने सांगितले.
१५ जून १९९७ या दिवशी मी ट्रस्टच्या बाल संगोपन केंद्रात प्रवेश घेतला. गेली १६ वर्षे ट्रस्टने माझे पालकत्व स्वीकारले आहे. अशोक गोडसे, महेश सूर्यवंशी यांच्यासह शिक्षक आणि केंद्रातील सर्वाच्या सहकार्यानेच माझे शिक्षण सुकर झाले. आता या संधी हा गणपती बाप्पाचा प्रसाद आहे, अशीच माझी भावना आहे. भावानेही बी. कॉम. पदवी संपादन केली असून तो सीए होण्यासाठी ट्रस्ट सहकार्य करणार आहे, असेही त्याने सांगितले.