मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत गणरायाचे पूजन

पुणे : करोनाचा प्रादुर्भाव होणार नाही याची दक्षता घेत सुरक्षित अंतराचे भान ठेवून विघ्नहर्त्यां गणरायाची शनिवारी प्रतिष्ठापना करण्यात आली. ढोल-ताशा पथकांचा दणदणाट आणि बँडपथकांच्या सुरेल सुरावटी ऐकू न येता ‘मंगलमूर्ती मोरया’चा गजर करीत मुखपट्टी परिधान केलेल्या मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत गणरायाचे पूजन करण्यात आले. उत्सवी स्वरूप आणि डामडौल टाळून उत्साहाने भारलेल्या मंगलमय वातावरणात मानाच्या गणपतींसह घरगुती गणरायाचे साधेपणाने स्वागत करण्यात आले.

प्रत्येकाच्या जीवनातील विघ्नांचे हरण करून सुखाची पखरण करणाऱ्या पुण्यनगरीच्या वैभवशाली गणेशोत्सवाला शनिवारी सुरुवात झाली. घरोघरी षोडशोपचार पूजनाने गणरायाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. प्रतिष्ठापनेसाठी पहाटेपासूनच मुहूर्त होते. त्यामुळे गर्दी टाळण्याच्या उद्देशातून अनेकांनी यापूर्वीच गणरायाची मूर्ती घरी आणून ठेवली होती. काहींनी शुक्रवारी सायंकाळनंतर गणरायाची मूर्ती घरी आणली. तर काहींनी शनिवारी सकाळी गणेशमूर्ती घरी आणून तिची प्राणप्रतिष्ठापना केली. घरच्या गणपतीची प्रतिष्ठापना झाल्यानंतर कार्यकर्ते मंडळांच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या मिरवणुकीत आणि ढोल-ताशा पथकात सहभागी होण्यासाठी घराबाहेर पडतात. मात्र, यंदा मिरवणूक नसल्याने कार्यकर्त्यांना घरच्या गणपतीची सजावट करण्यासाठी वेळ देता आला. ढोल-ताशा पथकातील युवक-युवतींनी एकत्र भेटून चहापान घेत गप्पांचा फड रंगविला. गणपतीच्या पूजेसाठी दूर्वा, कमळ, केवडा, गुलाब, शमी, अत्तर, अगरबत्ती, कापूर, पाच फळांचा वाटा, माव्याचे मोदक या साहित्य खरेदीसाठी मंडई आणि तुळशीबाग परिसर गर्दीने फुलून गेला होता.

करोना संकटाच्या पाश्र्वभूमीवर शासनाच्या नियमांचे पालन करून यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे मानाच्या गणपती मंडळ पदाधिकाऱ्यांनी यापूर्वीच जाहीर केले होते. पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक मंडळांनी मंदिरामध्येच गणरायाची प्रतिष्ठापना केली.  तर, मंदिर नसलेल्या मंडळांनी डामडौल न ठेवता मंडपाचा आकार कमी करून गणेशभक्तांची गर्दी होणार नाही याची दक्षता घेत गणरायाची प्रतिष्ठापना केली.

मानाच्या गणपती मंडळांची प्रतिष्ठापना अन्य मानाच्या मंडळ पदाधिकाऱ्यांच्या हस्ते मुहूर्तावर करून यंदाच्या उत्सवामध्ये एकोप्याचे अनोखे दर्शन घडविण्यात आले. गणेशभक्तांनी रस्त्यावर येण्याचे टाळून ऑनलाइन स्वरूपात गणरायाचे दर्शन घ्यावे, असे आवाहन करीत मंडळांनी भाविकांना ऑनलाइन दर्शनासाठी संकेतस्थळाचा पत्ता दिला आहे.

ग्रामदैवत आणि मानाच्या पहिल्या श्री कसबा गणपती मंडळाच्या गणरायाची प्रतिष्ठापना सकाळी ११ वाजून ४० मिनिटांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख आणि स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांच्या हस्ते झाली. सनई-चौघडय़ाच्या सुरांमध्ये श्री तांबडी जोगेश्वरी या मानाच्या दुसऱ्या गणपतीची प्रतिष्ठापना अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता झाली. श्री गुरुजी तालीम या मानाच्या तिसऱ्या गणपतीची प्रतिष्ठापना श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टचे उत्सवप्रमुख पुनीत बालन आणि उद्योजिका जान्हवी धारिवाल यांच्या हस्ते दुपारी १२ वाजून १५ मिनिटांनी झाली.

श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या मानाच्या चौथ्या गणपतीची प्रतिष्ठापना टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते दुपारी साडेबारा वाजता झाली. केसरीवाडा या मानाच्या पाचव्या गणपतीची प्रतिष्ठापना रोहित टिळक आणि प्रणती टिळक यांच्या हस्ते सकाळी १० वाजता झाली. तुळशीबाग मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली.

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या गणरायाची प्रतिष्ठापना गुरुजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता  करण्यात आली. अखिल मंडई मंडळाच्या समाज मंदिरामध्ये शारदा-गजाननाची प्रतिष्ठापना तांबडी जोगेश्वरी मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ टिकार यांच्या हस्ते दुपारी १२ वाजता झाली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या गणेश मंदिरामध्ये कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांच्या हस्ते गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली.