रिक्षाने प्रवास करीत असताना काही वेळेला प्रवाशांची मौल्यवान वस्तू किंवा पैशांची पिशवी रिक्षात विसरते.. संबंधित ऐवज कुठेतरी विसरल्याचे लक्षात येते तेव्हा प्रवाशाच्या काळजात धस्स होते.. आता आपली मौल्यवान वस्तू गेली याचे दु:ख मनात असतानाच अचानक कुठून तरी निरोप येतो व आपली वस्तू सुखरूप असल्याचे कळते.. रिक्षा पंचायतीच्या ‘हरवले- सापडले’ या उपक्रमाच्या माध्यमातून असा सुखद धक्का आजवर अनेक प्रवाशांना मिळाला आहे. या माध्यमातून प्रामाणिक रिक्षाचालकांच्या सहाय्याने अनेकांना रिक्षात विसरलेला मौल्यवान ऐवज परत मिळाला आहे.
अरेरावी करणारे किंवा भाडे नाकारणारे रिक्षाचालक आपण पाहत असतो. पण, काही रिक्षा चालकांचा प्रामाणिकपणाही नाकारून चालणार नाही. अशाच रिक्षाचालकांनी आजवर रिक्षा चालकांची प्रतिमा चांगली ठेवण्यास मदत केली आहे. या रिक्षाचालकांनी लाखोंचा ऐवज प्रवाशांना परत केला आहे. अनेकदा घाईत किंवा काही विचारात असल्यास जवळील वस्तू किंवा पिशवी रिक्षात विसरण्याचे प्रसंग घडत असतात. या वस्तू संबंधित प्रवाशांपर्यंत नेमक्या पोहोचवायच्या कशा, या प्रश्नाचे उत्तर शोधताना रिक्षा पंचायतीच्या ‘हरवले-सापडले’ या उपक्रमाची सुरुवात झाली.
मागील वीस वर्षांहून अधिक काळापासून हा उपक्रम सुरू आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून आजपर्यंत प्रवाशांचे लाखो रुपयांचे साहित्य, रोख रक्कम, महत्त्वाची कागदपत्रे, दागिने, लॅपटॉप, मोबाईल परत करण्यात आले आहेत. कधीकधी अत्यंत नाटय़मय घडामोडींनंतर प्रवाशाला त्याचे साहित्य परत मिळते. याचा एक किस्सा नुकताच घडला. रत्नागिरीतील व्यापारी अक्षय फाटक काही कामानिमित्त पुण्यात आले होते. त्यांनी रिक्षातून प्रवास केला. या प्रवासात जमिनीची महत्त्वाची कागदपत्रे व ३० हजारांची रोख रक्कम असलेली पिशवी ते रिक्षात विसरले. अंकुश जाधव या रिक्षाचालकाला ही पिशवी सापडली. त्याने ती पंचायतीच्या हरवले- सापडले उपक्रमामध्ये पंचायतीचे निमंत्रक नितीन पवार यांच्याकडे दिली.
पवार यांनी तातडीने पुढील कार्यवाही सुरू केली. पिशवीची उपक्रमाच्या नोंदवहीत नोंद झाली. पिशवी कुणाची हे कळायला मार्ग नव्हता. पण, पिशवीतील कागदपत्राची तपासणी केल्यानंतर फाटक यांचा रत्नागिरीचा पत्ता मिळाला. त्याचवेळी सिंधुदुर्गमधील वीज कामगारांचे नेते प्रदीप नेरुरकर हे पवार यांना भेटण्यासाठी आले होते. रत्नागिरी व सिंधुदुर्ग शेजारीच असल्याने काही माहिती मिळेल का, असे पवार यांनी नेरुरकर यांना सांगितले. त्यामुळे तेथूनच फोनाफोनी सुरू झाली. त्यानंतर काही वेळातच एका वायरमनकडून थेट फाटक यांचा मोबाईल क्रमांकच मिळाला. त्यानंतर काही वेळातच ही पिशवी फाटक यांच्या हातात पडली.
‘हरवले- सापडले’साठी संपर्क
रिक्षा पंचायतीच्या हरवले- सापडले या उपक्रमामध्ये रिक्षाचालकांनी प्रवाशांचे रिक्षात विसरलेले साहित्य पंचायतीच्या टिंबर मार्केट येथील कार्यालयात जमा करावे. त्याचप्रमाणे प्रवाशांनीही हरविलेल्या वस्तूची नोंद या कार्यालयात किंवा ०२०- २६४५७३०७ या दूरध्वनी क्रमांकावर करावी, असे आवाहन रिक्षा पंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.