पाच दिवसांच्या प्रस्तावाला पर्यावरण विभागाकडून उत्तर नाही

उत्सवात पाच दिवस ध्वनिक्षेपक सुरू ठेवण्याबाबत जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी पाठविलेल्या प्रस्तावाला राज्याच्या पर्यावरण विभागाने उत्तर न दिल्यामुळे शुक्रवार (२५ ऑगस्ट) पासून सुरू होत असलेल्या गणेशोत्सवादरम्यान ध्वनिक्षेपकाची रात्री बारापर्यंतची परवानगी चार दिवस मिळणार आहे. ध्वनिक्षेपक वापरण्यासाठी आवाजाची विहित मर्यादा पाळून सकाळी सहा ते रात्री बारापर्यंतची चार दिवसांची परवानगी यंदाही कायम ठेवण्यात आली आहे. त्यामध्ये गौरी विसर्जनाचा सातवा दिवस, नववा दिवस, दहावा दिवस आणि अनंत चतुर्दशी हे दिवस निश्चित करण्यात आले आहेत, याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी गुरुवारी जाहीर केला. गेल्यावर्षीच्या यादीनुसार दुसरा व पाचवा दिवस वगळण्यात आला आहे.

ध्वनिक्षेपक रात्री बारापर्यंत वाजवण्यासाठी वर्षांतील १० दिवसांची परवानगी देण्याचे सर्वाधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यानुसार गेल्यावर्षी चार दिवसांच्या यादीमध्ये दुसरा, पाचवा, सातवा आणि अकरावा दिवस होता. परंतु दुसऱ्या आणि पाचव्या दिवशी फारशी गर्दी होत नसल्यामुळे हे दोन दिवस वगळून त्याऐवजी यंदाच्या यादीत नववा आणि दहावा दिवस निश्चित करण्यात आला आहे. राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाच्या ध्वनिप्रदूषण नियमन व नियंत्रण नियम २०००, च्या कलम ५ (३) नुसार ध्वनिक्षेपक वापरासंदर्भात आवाजाची मर्यादा राखून चार दिवस सकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंतची सूट देण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या आदेशानुसार यंदा गणशोत्सवामध्ये गौरी विसर्जनाचा सातवा दिवस (३१ ऑगस्ट), नववा दिवस (२ सप्टेंबर), दहावा दिवस (३ सप्टेंबर) तर अनंत चतुर्दशीच्या दिवशी (बारावा दिवस, ५ सप्टेंबर) सकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनिवर्धक वाजविण्यासाठी सूट देण्यात आली आहे.

  • नियमाप्रमाणे चार दिवसांमध्ये सकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंतच ध्वनिक्षेपकांसाठी परवानगी
  • क्षेत्रनिश्चितीप्रमाणे ठरलेल्या मर्यादेपेक्षा अधिक आवाज वाढवता येणार नाही
  • आवश्यक तेथे ध्वनीचे शोषण करणारी विशिष्ट लाकडी सामुग्री लावणे बंधनकारक
  • शांतता क्षेत्रात ही परवानगी लागू असणार नाही. त्याठिकाणी डीजे वाजविण्यास बंदी कायम