पुणे : यंदा खडकवासला धरणसाखळी प्रकल्पामधील चारही धरणांमध्ये आतापर्यंत समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे धरणात ९४ टक्क्यांपर्यंत पाणीसाठा जमा झाला आहे. मात्र, गेल्या सात वर्षांच्या तुलनेत जून आणि जुलै महिन्यात पडलेला पाऊस कमीच आहे. सन २०१५ पासून आतापर्यंत (सन २०२० आणि २०१६ चा अपवाद वगळता) जून आणि जुलै या पावसाळ्याच्या पहिल्या दोन महिन्यांचा विचार के ल्यास धरणांच्या पाणलोट क्षेत्रात यंदापेक्षा जास्त पावसाची नोंद करण्यात आली होती.

शहराला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या धरणांमधून पाणीपुरवठा के ला जातो. मोसमी वारे सक्रिय झाल्यानंतर पहिल्या दोनच महिन्यांत टेमघर धरण परिसरात दोन हजार मिलिमीटर, वरसगाव आणि पानशेत धरणांच्या क्षेत्रात १५०० मि.मी., तर खडकवासला धरण परिसरात ४५० मि.मीपेक्षा जास्त पावसाची नोंद होते. त्यानुसार या चारही धरणांच्या परिसरात यंदा आतापर्यंत सरासरी एवढय़ा पावसाची नोंद झाली आहे. मात्र, गेल्या सात वर्षांचा विचार के ल्यास या धरणांमध्ये नोंद झालेला पाऊस कमी असल्याचे निरीक्षण जलसंपदा विभागाकडून नोंदवण्यात आले. मात्र, सन २०२० आणि २०१६ मध्ये नंतरच्या दोन महिन्यांत म्हणजेच ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाने सरासरी गाठली होती.

दरम्यान, यंदा हवामान विभागाने दोन टप्प्यांमध्ये व्यक्त के लेल्या अंदानुसार पहिल्या टप्प्यातील पाऊस धरणांच्या परिसरात यंदा पडला असून धरणांमध्ये पहिल्या दोनच महिन्यांत ९४ टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा जमा झाला आहे, तर दुसऱ्या टप्प्यातही धरणांच्या परिसरात चांगला पाऊस होणार असल्याने पुढील पावसाळ्यापर्यंत धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा निश्चित असेल, असा विश्वासही जलसंपदा विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

धरणांमधील पहिल्या दोन महिन्यांतील गेल्या सात वर्षांमधील पाऊस मि.मीमध्ये

धरण             २०२१   २०२०   २०१९   २०१८   २०१७  २०१६   २०१५

टेमघर          २२९०   १०४०    ३०४४   २४१०   २३५८   १९८३   २२२९

वरसगाव       १५८५   ६९८     २१९८   १५५३    १५४०   १४७४   १५६५

पानशेत         १६११  ७३३     २२१०    १५४५     १५२९   १४६६   १५९२

खडकवासला    ४९१   ३३१     ७९१      ४३८        ४४६     ५७०    ४८६