पुणे :  थकबाकी वसुलीसाठी अभय योजना महापालिकेकडून राबविण्यात येत असली तरी या योजनेतून मोठय़ा प्रमाणावर उत्पन्न मिळतच नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी राबविण्यात आलेल्या दोन अभय योजनांमध्ये मिळून ५२६ कोटी रुपये मिळाले आहेत. मिळकतकराची थकबाकी पाहता मिळालेले उत्पन्नही जेमतेमच असून के वळ सामान्य नागरिकच या योजनेत थकबाकी भरत असून बडे थकबाकीदार अभय योजनेलाही जुमानत नसल्याचे यानिमित्ताने दिसून येत आहे. त्यामुळे यंदा ५० लाखांपर्यंतचे थकबाकीदार थकीत रक्कम भरणार का, याबाबत संदिग्धता आहे. तसेच थकबाकी वसुलीचा दावाही कागदावरच राहण्याची शक्यता आहे.

मिळकतकराची थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिकेच्या स्थायी समितीने अभय योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. पन्नास लाखांपर्यंतची थकबाकी असलेल्या थकबाकीदारांसाठी ही अभय योजना आहे. अभय योजनेतूने महापालिकेच्या तिजोरीत उत्पन्न जमा होईल, असा दावा सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि कर आकारणी तसेच कर संकलन विभागाकडून करण्यात आला आहे. वास्तवातील चित्र मात्र वेगळे असून अभय योजना राबविल्यानंतरही थकबाकीदार त्याकडे पाठ फिरवीत असल्याचे यापूर्वी राबविलेल्या अभय योजनेतून पुढे आले आहे.

मिळकत कर, त्यावरील दंड आणि व्याज अशी थकबाकीची आकारणी करण्यात येते. निवासी, बिगर निवासी ( व्यावसायिक मिळकती) तसेच मोबाइल टॉवर आकारणीपोटीची एकत्रित थकबाकी ५ हजार ७३९ कोटी रुपये एवढी आहे. यात निवासी आणि बिगर निवासी मिळकतींच्या थकबाकीची रक्कम २ हजार ११७ कोटी आहे. तर ५ लाख ३५ हजार ४१० थकबाकीदार आहेत. मोबाइल टॉवर्सची थकबाकीही ३ हजार २७१ कोटी एवढी आहे. थकबाकीविरोधात काही मोबाइल कंपन्यांनी न्यायालयात दाद मागितली आहे. न्यायप्रविष्ट दावे आणि मोबाइल टॉवर्सना अभय योजनेतून वगळण्याने थकबाकी किती वसूल होईल, याबाबत संदिग्धता आहे. निवासी आणि बिगर निवासी थकबाकीतून जेमतेम आठशे ते नऊ शे कोटी रुपये योजनेतून प्राप्त होतील, असा दावा के ला जात आहे. प्रत्यक्षात सन २०१५ मध्ये राबविण्यात आलेल्या अभय योजनेतून २११ कोटी तर त्यानंतर सन २०१६ मध्ये राबविण्यात आलेल्या अभय योजनेतून ३१५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

नोटबंदी वेळच्या योजनेचा अपवाद

व्यवहारात असलेल्या पाचशे आणि एक हजार रुपयांच्या चलनी नोटा रद्द झाल्यानंतर त्या बँकांमध्ये जमा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या कालावधीत महापालिका निवडणुका डोळ्यासमोर २०१६ मध्ये मिळकत कर अभय योजना राबविण्यात आली. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यातून ३१५ कोटी रुपये तिजोरीत जमा झाले होते.

अभय योजनेतून किती रक्कम जमा होईल, हे सांगता येणार नाही. यंदा व्याजाच्या रकमेत भरघोस सवलत देण्यात आली आहे. त्याचा थकबाकीदारांनी लाभ घ्यावा आणि भविष्यातील कारवाई टाळावी.

– विलास कानडे, कर आकारणी आणि करसंकलन प्रमुख, महापालिका