22 April 2019

News Flash

थंडीचा राज्यभर कहर!

लवकरच हवामानात आमूलाग्र बदलाचे संकेत

नाशीकमध्ये दोन मृत्युमुखी; लवकरच हवामानात आमूलाग्र बदलाचे संकेत

थंडीचा निरोप घेऊन उन्हाळ्याची चाहूल लागण्याची शक्यता असतानाच थंडीने पुन्हा डोके वर काढून कहर केला आहे. सर्वच ठिकाणी किमान तापमान सरासरीच्या खाली आले असल्याने राज्याला हुडहुडी भरली आहे. नाशिकमध्ये शनिवारी चार अंश या हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद झाली असून उघडय़ावर वास्तव्य करणाऱ्या दोन जणांचा मृत्यू झाला. निफाड तालुक्यात पारा तीन अंशापर्यंत खाली घसरला. राज्यातील हवामानात पुढील तीन ते चार दिवसांमध्ये आमूलाग्र बदल होण्याची शक्यता असून, काही भागात थंडीच्या लाटेबरोबरच अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवस थंडीचा कडाका कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे गेल्या आठवडय़ामध्ये किमान आणि कमाल तापमानात वाढ होऊन थंडी गायब झाली होती. त्यामुळे आता उन्हाळा सुरू होईल, अशी शक्यता असतानाच बाष्पयुक्त वाऱ्यांचे प्रवाह थांबले आणि उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव वाढला. त्यातच बहुतांश भागात निरभ्र आकाश राहिल्याने किमान तापमानामध्ये लक्षणीय घट होऊन राज्यात थंडीचा कडाका वाढला.

नाशिकच्या तापमानात कमालीची घट झाली असून, शनिवारी राज्यातील नीचांकी ४.० अंश सेल्सिअस तापमान तेथे नोंदविले गेले. महाबळेश्वरमध्ये अनेक ठिकाणी बर्फ जमा झाल्याचे चित्र होते. मध्य महाराष्ट्रात पुण्यामध्ये हंगामातील नीचांकी ५.१ अंश किमान तापमानाची नोंद झाली. महाबळेश्वरसह नगर, जळगाव, मालेगाव, सांगली, सातारा आदी भागातही पारा ६ ते ९ अंशांवर होता. कोकण विभागात मुंबईत १५.६ अंश किमान तापमान नोंदविले गेले. सरासरीपेक्षा हे तापमान ३.८ अंशांनी कमी आहे. त्याचप्रमाणे कमाल तापमानातही घट झाल्याने थंडी अवतरली आहे. सांताक्रुझ येथे ११.० किमान तापमान नोंदविले गेले. रत्नागिरी, अलिबाग येथेही तापमानातत घट होऊन थंडीचा कडाका वाढला आहे.

मराठवाडय़ात औरंगाबादमध्ये सर्वाधिक थंडी असून, तेथे ६.५ अंश कमाल तापमान नोंदविले गेले. बीड आणि नांदेडमध्ये तापमानाचा पारा ९ अंशांच्या आसपास आहे. विदर्भात नागपूर येथे ८.९, तर अमरावती, बुलडाणा येथे १० अंशांखाली किमान तापमान असून, इतर ठिकाणी ११ ते १२ अंशांवर किमान तापमान आहे. राज्यात सर्वच ठिकाणी कमाल तापमानातही सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाल्याने दिवसाही थंड वारे वाहात आहेत.

किमान तापमान (अंश सेल्सिअस)

मुंबई (कुलाबा) १५.६, सांताक्रुझ ११.०, अलिबाग १३.२, रत्नागिरी ११.७, पुणे ५.१, नाशिक ४.०, नगर ६.१, जळगाव ८.०, कोल्हापूर १३.१, महाबळेश्वर ९.०, मालेगाव ७.८, सांगली ८.४, सातारा ६.८, सोलापूर १२.१, औरंगाबाद ६.५, परभणी ११.०, नांदेड ९.५, बीड ९.१, अकोला १०.०, अमरावती ९.०, बुलडाणा ९.२, ब्रम्हपुरी ११.३, चंद्रपूर १३.२, गोंदिया १२.४, नागपूर ८.९, वाशिम १४.२, वर्धा १३.०, यवतमाळ १०.४.

थंडीभान.. : उत्तरेकडून येणारे थंड वाऱ्यांचे प्रवाह आणि राज्यातील कोरडे हवामान तसेच निरभ्र आकाशाची स्थिती लक्षात घेता पुढील काही दिवस थंडी कायम राहण्याची शक्यता आहे. १० फेब्रुवारीला मध्य महाराष्ट्रात अवकाळी पाऊस, तर विदर्भ, उत्तर मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट येण्याचा अंदाज आहे. ११ आणि १२ फेब्रुवारीला मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात अवकाळी पाऊस, १२ फेब्रुवारीला उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी गारपीट आणि १३ फेब्रुवारीला मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

First Published on February 10, 2019 12:16 am

Web Title: low temperature in maharashtra 2