घरगुती गॅस सिलिंडरच्या अनुदानासाठी बँक खाते गॅस ग्राहकाच्या खात्याशी जोडण्यासाठी सरकारने तीन महिन्यांची मुदत दिली आहे. ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास गॅसवरील अनुदान मिळणार नाही, अशी माहिती भारत पेट्रोलियम कार्पोरेशनचे अध्यक्ष ए. वरदराजन यांनी दिली.
वरदराजन म्हणाले, भारत पेट्रोलियमचे चार कोटी दोन लाख ग्राहक आहेत. सद्यस्थितीत त्यापैकी ६४ टक्के ग्राहकांनी त्यांच्या बँक खात्याची जोडणी केली आहे. पुढील काळात अनुदानाची रक्कम गॅस ग्राहकाच्या बँकेच्या खात्यातच जमा केली जाणार आहे. त्यामुळे बँक खाते जोडण्याची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यकच आहे. तीन महिन्यांनंतरही ही प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या ग्राहकांना अनुदान मिळणार नाही व पूर्ण किमतीला सिलिंडर खरेदी करावा लागेल.
घरगुती गॅसबाबत ‘माय एलपीजी डॉट इन’ हे वेब पोर्टल तयार करण्यात आल्याचे सांगून ते म्हणाले, या पोर्टलला दर महिन्याला ३५ लाख नागरिक भेट देतात. त्यावर गॅसच्या खात्याची सर्व माहिती अद्ययावत केलेली असते. नागरिकांना अनुदान व इतर गोष्टींबाबतची सर्व माहिती या पोर्टलवर पहायला मिळेल.