News Flash

दीड कोटी रुपयांचा ‘एलएसडी’ अमली पदार्थ जप्त

‘एलएसडी’चा एक थेंब १८०० रुपयांना!

लिसर्जिक अॅसिड डायएथिलामाईड (एलएसडी) हा द्रव स्वरुपातील महागडा अमली पदार्थ गोव्यामधून पुण्यात विक्रीसाठी आणणाऱ्या दोघांना अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून जप्त केलेल्या अमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत तब्बल दीड कोटी रुपये इतकी आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाने चालू वर्षांमध्ये केलेली ही सर्वात मोठी कामगिरी आहे. अटक आरोपींना दोन दिवस पोलस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
टॅरेन्स फिरदोस मेहता (वय ३०, रा. बी. टी. कवडे रस्ता, मुंढवा) व यश अविनाश जोगळेकर (वय २९, रा. श्रीनिकेत अपार्टमेंट, भांडारकर रस्ता, डेक्कन जिमखाना) यांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. गोवा येथून अमली पदार्थ घेऊन त्याची पुण्यात विक्री केली जात असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत नवले व त्यांच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सापळा लावून आरोपींना पकडण्यात आले.
मेहता याच्याकडून ९० मिली लीटर एलएसडी, ४० ग्रॅम चरस, एलएसडी ड्रॉप टाकलेल्या २० पांढऱ्या वडय़ा, डिजिटल वजनकाटा व रोख २७ हजार ६०० रुपये जप्त केले. जोगळेकर याच्याकडून एलएसडी ड्रॉप टाकलेल्या  १४ पांढऱ्या वडय़ा व सात मिली लीटर एलएसडी जप्त करण्यात आले आहे. दोन्ही आरोपी हे बारावीपर्यंत शिकले आहेत. दोघेही अविवाहित असून, ते पूर्वी जेट एअरवेजमध्ये कामाला होते. मात्र, तांत्रिक कारणाकरून त्यांना कामावरून काढून टाकण्यात आले होते. हे काम सुटल्यानंतर जोगळेकर एका नामांकित कंपनीत काम करीत होता. पण, ही नोकरीही त्याने सोडली होती. मेहता याने नोकरी सुटल्यानंतर आईस्क्रीम पार्लर चालविण्यासाठी घेतले होते.
दोघेही आरोपी गोव्यामधून अमली पदार्थ आणून त्याची पुण्यात विक्री करीत होते. वरिष्ठ निरीक्षक श्रीकांत नवले, सहायक निरीक्षक अजय वाघमारे, कर्मचारी अविनाश शिंदे, ज्ञानदेव घनवट, राकेश गुजर, रामदास जाधव, कुणाल माने, रामचंद्र यादव, प्रफुल्ल साबळे, राजेंद्र बारशिंगे, विठ्ठल खिलारे, नितीन सानप, सचिन चंदन व संगीता जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.

‘एलएसडी’चा एक थेंब १८०० रुपयांना!
‘एलएसडी’ या द्रव स्वरुपातील अमली पदार्थाच्या विक्रीतील आरोपी टॅरेन्स मेहता, यश जोगळेकर यांनी पुण्यामध्ये आतापर्यंत १३ मिली लिटर ‘एलएसडी’ विक्री केल्याचे त्यांच्याकडील तपासात स्पष्ट झाले आहे. ‘एलएसडी’च्या एका मिली लिटरचे १५ थेंब होतात. विशेष म्हणजे एका थेंबासाठी ते तब्बल १८०० रुपये घेत होते. शहरातील सॉफ्टवेअर कंपन्यात काम करणारे तरूण व महाविद्यालयातील युवकांना त्यांनी हा अमली पदार्थ विकला आहे. अमलीपदार्थ कोणाकडून घेतला व कोणाला विकला याचा पोलिसांकडून तपास करण्यात येत असून, अमली पदार्थ विकत घेणाऱ्यांचीही चौकशी करून कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2015 3:25 am

Web Title: lsd drug of rs 1 50 cr
Next Stories
1 ‘स्मार्ट सिटी’च्या समावेशासाठी मोदींना भेटू – अजित पवार
2 मंत्रीच म्हणतात.. अधिकारी खोटे बोलतात!
3 ‘ग्रीन कॉलेज, क्लिन कॉलेज’ योजनेला प्रारंभ,सुमारे ८०० महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी
Just Now!
X