03 August 2020

News Flash

‘एलएसडी स्टॅम्प’चा महाविद्यालयीन युवकांना विळखा

उच्चभ्रूंच्या पाटर्य़ामध्ये नशेसाठी सर्रास वापर

(संग्रहित छायाचित्र)

महाविद्यालयीन युवक तसेच उच्चभ्रू समाजातील व्यक्तींना जाळ्यात ओढून शहरात सर्रास अमली पदार्थाची विक्री केली जात आहे. गेल्या वर्षभरापासून एलएसडी स्टॅम्प या अमली पदार्थाचा वापर वाढीस लागला आहे. टपाल तिकिटा प्रमाणे दिसणाऱ्या एलएसडी स्टॅम्प या अमली पदार्थाच्या विळख्यात शहरातील अनेक जण सापडले आहेत.

ब्राऊन शुगर, कोकेन, चरस, गांजा अशा अमली पदार्थाची विक्री करणाऱ्यांनी शहरात त्यांचे जाळे निर्माण केले असून गेल्या वर्षभरापासून एलएसडी स्टॅम्प नावाचा अमली पदार्थ छुप्या पद्धतीने देशात विक्रीसाठी आणला जात आहे. उच्चभ्रूंच्या पाटर्य़ामध्ये एलएसडी स्टॅम्पचा वापर वाढला आहे. महाविद्यालयीन युवकदेखील या नशेच्या आहारी गेल्याची माहिती देण्यात आली. अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्यांकडून एलएसडीला (लायसेरजिक अ‍ॅसीड डायथेलामाईड) ‘अ‍ॅसिड’ असे टोपण नाव देण्यात आले आहे.

एलएसडी द्रवस्वरुपात, गोळ्या तसेच टपाल तिकिटाप्रमाणे भासणाऱ्या कागदावर चिटकवून विकण्यात येते. पुणे, मुंबईसह देशातील प्रमुख महानगरात महाविद्यालयीन युवक तसेच उच्चभ्रूंच्या पाटर्य़ामध्ये एलएसडी स्टॅम्पचा वापर वाढला आहे, असे निरीक्षण  सीमाशुल्क विभागाच्या सहआयुक्त (अमलीपदार्थ विरोधी विभाग) वैशाली पतंगे यांनी नोंदविले.

गेल्या वर्षभरात सीमाशुल्क विभागाच्या पुणे विभागाकडून तीन वेगवेगळ्या कारवायांमध्ये अमली पदार्थ विक्रेत्यांकडून ६४१ एलएसडी स्टॅम्प जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या एलएसडी स्टॅम्पची किंमत ३१ लाख रुपये आहे. कस्टमच्या पुणे विभागाने गेल्या आठवडय़ात कोंढव्यातील एनआयबीएम रस्त्यावर एका महिलेला एलएसडी     स्टॅम्पच्या विक्री प्रकरणात अटक केली होती. त्या महिलेकडून ४१६ एलएसडी स्टॅम्प जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या स्टॅम्पची किंमत २० लाख रुपये असल्याचे पतंगे यांनी सांगितले.

पुण्यात मोठय़ा संख्येने परगावाहून तसेच परदेशातून विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. अमली पदार्थाचे विक्रेते महाविद्यालयीन युवकांना जाळ्यात ओढत आहेत. या पार्श्वभूमीवर अमली पदार्थाची विक्री करणाऱ्यां विरोधात पुणे पोलिस तसेच कस्टमच्या पथकाकडून गेल्या काही दिवसांपासून कारवाई तीव्र करण्यात आली आहे.

एलएसडी स्टॅम्पचा शिरकाव

देशात विक्रीसाठी छुप्या पद्धतीने एलएसडी स्टॅम्प विक्रीसाठी पाठविले जात असून अमली पदार्थाची विक्री  करणारे ‘डार्कनेट’चा वापर करून परदेशातून एलएसटी स्टॅम्प मागावून घेतात. परदेशातील अमली पदार्थ विक्रेत्यांकडे मागणी केल्यानंतर देशात ते छुप्या पद्धतीने विक्रीसाठी पाठविले जातात. मध्यंतरी शहरात एका महिलेकडून जप्त करण्यात आलेल्या एलएसडी स्टॅम्प प्रकरणाच्या तपासात तामिळनाडूतील सालेम जिल्ह्य़ातून अमली पदार्थ विक्रीसाठी पाठविण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते.

कस्टमकडून दीड कोटींचे अमली पदार्थ जप्त

यंदाच्या वर्षांत सीमाशुल्क विभागाच्या पुणे पथकाने १ कोटी ५१ लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. आजवर ६४१ एलएसडी स्टॅम्प जप्त करण्यात आले असून अमली पदार्थाची विक्री प्रकरणात नायजेरियन नागरिकांना अटक केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2019 12:24 am

Web Title: lsd stamp laments college youth abn 97
Next Stories
1 सायकल योजना गुंडाळल्यात जमा
2 पिंपरी-चिंचवड : भाजपा, राष्ट्रवादीचे महापौर,उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल
3 पुणे : महापौरपदासाठी भाजपाकडून मुरलीधर मोहोळ, तर आघाडीकडून प्रकाश कदम रिंगणात
Just Now!
X