19 September 2020

News Flash

कासारवाडीत ८३ लाखांचा डल्ला; चोरांचा सुळसुळाट कायम

‘सरप्राइज अॅक्सेसरीज’ या दालनातील रोख अडीच लाखांसह ८३ लाखांचा माल पळवून आरोपींनी पोबारा केल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

| October 1, 2013 02:36 am

कासारवाडीत गेल्या दोन महिन्यांत तब्बल १५ घरफोडय़ा व जबरी चोऱ्यांच्या घटना घडल्या आहेत. मात्र, भुरटय़ा चोरांचा सुळसुळाट रोखण्यात भोसरी पोलीस अपयशी ठरले आहेत. एका घटनेतील आरोपींचे सीसीटीव्ही फुटेज देऊनही त्या आरोपींचा माग पोलिसांना घेता आला नाही. त्यातच सोमवारी येथील ‘सरप्राइज अॅक्सेसरीज’ या दालनातील रोख अडीच लाखांसह ८३ लाखांचा माल पळवून आरोपींनी पोबारा केल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
कासारवाडीतील नाशिक फाटय़ालगत एकाच भागात आतापर्यंत सुमारे १५ घरफोडय़ा झाल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. पवना बँकेचे संचालक जितेंद्र लांडगे यांच्या घरातून दिवसाढवळ्या ७० तोळे सोने व दोन लाखांची रक्कम चोरीला गेली होती. त्या गुन्ह्य़ातील आरोपी सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. लांडगे यांनी पोलिसांना फुटेज दिले. मात्र, आरोपींना पकडण्यात भोसरी पोलिसांना यश आलेले नाही. त्याआधी व नंतरही छोटय़ा-मोठय़ा चोरीच्या घटना याच परिसरात झाल्या असून अजूनही हे सत्र कायम आहे.
‘सरप्राइज’ या दालनातून रोख रकमेसह सीडी प्लेअर, टेपरेकॉर्डर, संगणक संच, कॅमेरे आदींसह ८३ लाखांचा माल चोरीला गेला. लॉकशेजारी असलेली फरशी चोरटय़ांनी फोडली. डाव्या-उजव्या बाजूच्या कडय़ा वर केल्या, शटर उचकटले व सर्व ऐवज घेऊन पोबारा केला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांनी घटनास्थळी भेट दिली. भोसरी ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश केकाणे, चंद्रकांत भोसले या वेळी हजर होते. कासारवाडीतील वाढत्या चोरींच्या घटनेविषयी व योग्य पद्धतीने तपास होत नसल्याने उमाप यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या संदर्भात, आरोपी लवकरच गजाआड करू, असा विश्वास उमाप यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 1, 2013 2:36 am

Web Title: lump of 83 lakhs in kasarwadi
Next Stories
1 अमूर्त शैलीचे प्रसिद्ध चित्रकार विजय शिंदे यांचे निधन
2 ‘स्वच्छ’ची सेवा थांबवून कचरा व्यवस्थापन टेंडर प्रक्रियेद्वारे करण्याचा विद्यापीठाचा निर्णय
3 दिवाळीसाठी एसटीकडून अडीच हजार जादा गाडय़ा
Just Now!
X